ठाणे : कल्याण शहरातील मुख्य वर्दळीच्या बैलबाजार ते शिवाजी चौक, लालचौकी दरम्यान महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे रस्तारूंदीकरण आणि काँक्रीटीकरणाची कामे सुरू आहेत. पावसाळ्यात ही कामे सुरू राहिली तर अभूतपूर्व वाहतूक कोंडी आणि प्रवाशांना मनस्ताप होण्याची शक्यता आहे. पावसाळ्याच्या चार महिन्यात ही कामे थांबवा, असे पत्र ठाणे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता शशिकांत सोनटक्के यांना पाठविले आहे.
वर्दळीच्या रस्त्यावर काँक्रीटीकरणाची कामे - कल्याण-शीळफाटा २१ किमी रस्त्याच्या रुंदीकरण आणि काँक्रीटीकरणाची कामे एमएसआरडीसीतर्फे टप्प्याने सुरू आहेत. ही कामे काटई नाका, सूचक नाका, लाल चौकी, बैलबाजार भागात सुरू आहेत. ज्या भागात भूसंपादन आणि रुंदीकरणाला अडथळा नाही, तेथे महामंडळातर्फे तातडीने काम सुरू केले जाते. कल्याण शहरात बैल बाजार, लालचौकी भागात गेल्या वर्षापासून काँक्रीटीकरणाची कामे सुरू आहेत. कल्याण पश्चिम भागातील बैलबाजार, शिवाजी चौक, सहजानंद चौक, अहिल्याबाई चौक, लाल चौकी हा सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे.
शाळा सुरु होत असल्याने रहदारीसह वर्दळ वाढणार - या रस्त्यावरील बैल बाजार, लालचौकी भागात रस्ते काम सुरू आहेत. पुढील टप्प्यातील शिवाजी चौक, सहजानंद चौक, अहिल्याबाई चौकातील कामे पावसाळ्यात सुरू राहिली तर या रस्त्यांवर वाहन कोंडी होईल. शहरांतर्गत वाहतूकही विस्कळीत होईल. पुढील आठवड्यात शाळा सुरू होणार आहे. मुलांना वेळेत शाळेत पोहचणे, घरी येणे तितकेच गरजेचे आहे. त्यामुळे कल्याण शहरांतर्गत रस्ते कामे पावसाळ्यानंतर करण्यात यावी, अशी सूचना उपायुक्त पाटील यांनी महामंडळाला केली आहे.
स्मार्ट सिटी योजनेचे संथगतीने कामे सुरु - शिवाजी चौक परिसरात घाऊक बाजारपेठ आहे. बाजार समिती परिसर याच रस्त्यावर आहे. दररोज बाजार समितीत सुमारे ८०० भाजीपाला, मालवाहू ट्रक या भागात येतात. धान्य बाजारात मालवाहू ट्रकची येजा सुरू असते. या वाहतुकीवर रस्ते कामाचा परिणाम होण्याची शक्यता अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे. कल्याण शहराचे मुरबाड रस्ता, पारनाका परिसर कल्याण-शीळफाटा रस्त्याला छेदून एकमेकांना जोडले आहेत. या पोहच रस्त्यावरील वाहतुकीला रस्ते काँक्रीटीकरण कामाचा अडथळा येण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली. शहरांतर्गत कामे सुरूच राहिली तर वाहतूक विभागाचा निम्मा कर्मचारी वर्ग या भागात तैनात करावा लागेल. कल्याण रेल्वे स्थानक भागात स्मार्ट सिटीतर्फे परिसर विकासाचे काम गेल्या वर्षापासून सुरू आहे. ही कामे संथगतीने सुरू असल्याने दररोज अभूतपूर्व वाहन कोंडीला प्रवाशांना सामोरे जावे लागते. तशी परिस्थिती शिवाजी चौक भागात होऊ नये म्हणून वाहतूक विभागाने विशेष काळजी घेतली आहे.
दोन्ही भागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया - ठाणे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्याशी संर्पक साधला असता कल्याण शहरांतर्गत एमएसआरडीसीची सुरू असलेली कामे थांबवा असे सुचविले आहे. पावसाळ्यात या कामांमुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. तीन महिन्यानंतर उर्वरित कामे सुरू करा असे सचुविले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर या बाबत राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता शशिकांत सोनटक्के यांच्याशी संपर्क साधला असता, कल्याणमधील सुरू असलेली कामे जून अखेरपर्यंत पूर्ण करणार आहोत. ही कामे अर्धवट ठेऊन दिली तर पुन्हा ही कामे हाती घेताना अडचणी येण्याची शक्यता आहे. सुरू असलेली कामे पूर्ण करून तीन महिन्यानंतर उर्वरित कामे हाती घेऊ असेही त्यांनी सांगितले.