ठाणे - सरकारच्या आश्वासनाची मनसेने खिल्ली उडवून शहरात फक्त आश्वासनांचा पाऊस सुरू आहे. विकासकामांसाठी साडेसहा हजार कोटी रुपये निधी, 27 गावांची वेगळी नगरपालिका आणि नुकतेच राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत साडे चारशे कोटीचे रस्ते मंजूर झाल्याची घोषणा केली. मात्र, कोणतेही ठोस काम झाले नाही. डोंबिवलीकर विविध समस्यांनी त्रस्त असून त्यांना फक्त आश्वासने दिली जात आहेत. त्याचा निषेध म्हणून मनसेने विडंबनात्मकरित्या विमानतळाचे भूमिपूजन केले.
हेही वाचा - ओसामा बिन लादेनचा मुलगा हामजा बिन लादेन ठार; डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती
शनिवारी केलेल्या या लक्षवेधी आंदोलनादरम्यान मनसेचे शहर संघटक प्रल्हाद म्हात्रे यांनी भूमिपूजन सोहळ्याचे यजमान पद स्विकारले होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष तथा शहराध्यक्ष राजेश कदम, पालिका विरोधी पक्ष नेते तथा जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर, गटनेते मंदार हळबे, मनविसेचे डोंबिवली शहराध्यक्ष सागर जेधे, नगरसेविका सरोज भोईर, शहराध्यक्षा मंदा पाटील, दीपिका पेडणेकर, प्रथमेश खरात, वेदप्रकाश पांडे, यांच्यासह मनसैनिक आणि डोंबिवलीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा - हिंगणाचे माजी भाजप आमदार विजय घोटमारे राष्ट्रवादीत; शरद पवार यांच्या उपस्थितीत केला प्रवेश
डोंबिवली पश्चिमेला खाडीकिनारी रेतीबंदरजवळ मनसेकडून तीन हजार कोटींच्या विमानतळचे भूमिपूजन कार्यक्रम करत उपहासात्मकरित्या आंदोलन केले. या भूमिपूजन सोहळ्यासाठी सर्व प्रकारची तयारी करण्यात आली होती. काही मनसैनिक अरबी वेशभूषेत होते. त्यांच्या हस्ते न होणाऱ्या विमानतळासाठी तीन हजार कोटींचा निधी मनसे पदाधिकाऱ्यांना देऊन कराराचा देखावा करण्यात आला. यावेळी मनसैनिकांनी सरकारने दिलेल्या आश्वासनांचे फुगे सोडून निषेध करून आम्हीही आश्वासने देण्यात मागे नाही हे दाखवून दिले. कल्याण तालुकावासीयांना विदेश व विमान प्रवास करण्यासाठी मुंबई, पुणे एअरपोर्टला जावे लागत होते. आता इतक्या दूर जावे लागणार नाही. या वर्षात डोंबिवलीच्या मोठागाव येथे लवकरच मनसेच्या पुढाकाराने विमानतळ उभारले जाणार आहे. या विमानतळ भूमीपूजनाची जोरदार तयारी करण्यात आली होती. या प्रतिकात्मक आंदोलनात डोंबिवलीकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
हेही वाचा - 'वंचित'मुळे भाजपला लोकसभा निवडणुकीत फायदा - शरद पवार
अद्यापपर्यंत भाजप सत्तेत आल्यापासून व आधीपासून विविध प्रकल्पांच्या कोट्यवधी रूपये मंजूरीच्या फक्त घोषणांची विमाने उडाली. मात्र, कल्याण-डोंबिवलीकरांना त्याचा काडीमात्र फायदा अथवा विकास झाला नाही. सरकारचे व त्यांच्या लोकप्रतिनिधींच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी डोंबिवलीकरांतर्फे डोंबिवली विमानतळाचे भूमिपूजन प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. आम्हीसुद्धा न होणाऱ्या परंतु कोट्यावधींच्या विकास प्रकल्पाची जाहिरात करू शकतो, असेही मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी यावेळी बोलताना सांगितले.