ठाणे - एकीकडे राज्यासह कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नागरिकांना कोणतेही समारंभ व मोठे कार्यक्रम आयोजित करू नका असे आवाहन केले आहे. अशातच त्यांच्याच पक्षाचे नगरसेवक मुख्यमंत्र्याचे आवाहन पायदळी तुडवत असल्याचे दिसून आले आहे. खळबळजनक बाब म्हणजे कल्याण-डोंबिवली महापालिकेचे पूर्वेकडील नगरसेवक नवीन गवळी यांचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा होत असताना अचानक दोन गटात हाणामारी व गोळीबार झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचा - बीड जिल्ह्यात गुरुवारी मध्यरात्रीपासून दहा दिवस लॉकडाऊन
जुन्या भांडणाच्या वादातून हाणामारी व गोळीबार
कल्याण पूर्व मधील शिवसेनेचे नगरसेवक नवीन गवळी यांचा वाढदिवसानिमित्त चक्की नाका परिसरात काल मध्यरात्रीच्या शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. वाढदिवस साजरा केल्यानंतर नगरसेवक नवीन गवळी हे त्यांच्या घरी निघून गेले. त्यानंतर त्यांच्या कार्यालयासमोर त्यांचे काही समर्थ उभे असतानाच या ठिकाणी निलेश गवळी व महेश भोईर हे दोघे जण आले. विशेष म्हणजे निलेश गवळी यांचे काही महिन्यापूर्वी जगदीश राठोड नावाच्या तरुणासोबत भांडण झाले होते. त्यावेळी निलेश व जगदीश यांच्यात चर्चा सुरू असतानाच निलेश सोबत आलेल्या महेश भोईर यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. या वादाचे रूपांतर हाणामारी झाले.
अंदाधुंद गोळीबारामुळे पळापळ
याच दरम्यान महेशने आपल्या जवळ असलेल्या रिव्हॉल्व्हर काढली आणि गोळीबार करण्यास सुरुवात केली. या झटापटीत एक गोळी रस्त्यावर उभ्या असलेल्या गाडीला लागली. तर गोळीबाराचा आवाज येताच परिसरामध्ये एकच गोंधळ उडाला व लोकांमध्ये पळापळ सुरू झाली होती. या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही गटातील काही जणांवर गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे.
हेही वाचा - कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने वाढली चिंता; शेअर बाजार निर्देशांकात ८७१ अंशांची पडझड