ठाणे - कल्याण-डोंबिवली शहरातील नागरिकाना विरंगुळ्यासाठी किंवा दिवसभर निसर्गाच्या संन्निध्यात विसावता येईल, असे हक्काचे ठिकाण अखेर केडीएमसीच्या प्रयत्नाने साकार झाले आहे. कल्याण जवळील आंबिवली येथील वन विभागाच्या जागेत केडीएमसी, वनविभाग व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून निसर्ग उद्यान साकारण्यात आले आहे. या निसर्ग उद्यानात पक्षांना फुलपाखरांना आकर्षित करणारी झाडे, औषधी वनस्पती झाडे लावण्यात आले.
मनमोहून टाकणारे सकाळचे दृश्य
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत असलेल्या आंबवली रेल्वे स्थानकानजीक बल्याणी गावात एकेकाळी ओस पडलेल्या या जमिनीवर आता जणू हिरवा शालू पांघरा आहे. या निसर्ग उद्यानात विविध प्रकारचे पक्षी फुलपाखरे तसेच सरपटणाऱ्या प्राण्यांचा संचारही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पक्ष्यांच्या किलबिलाटामुळे येथील मनमोहून टाकणारे सकाळचे दृश्य डोळ्याचे पारणे फेडतानाचा अनुभव निर्सगप्रेमी घेताना दिसत आहे. या निसर्ग उद्यानात बागडणारी विविधरंगी फुलपाखरे, विविध जातीचे पक्षी, विविध प्रकारचे प्राणी निसर्गप्रेमींना उद्यानातून जणू साद घालत असल्याचा भास या ठिकाणी होतो.
50 एकर जमिनीवर साकारले उद्यान
कल्याण-डोंबिवली शहर स्मार्ट सिटी म्हणून उदयास येत आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या निधीतून कोट्यांवधींची विकासकामे सुरू आहेत. त्यापैकीच एक असलेल्या रिंग रोडसह विविध प्रकल्पात उभारणीसाठी बाधित होणाऱ्या झाडे तोडण्यात येतात. मात्र, तोडलेल्या झाडाच्या बदल्यात पाच पट झाडे लावण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी महापालिका प्रशासनाने वन विभागाच्या आंबिवली येथील सुमारे 50 एकर जागेवर सामाजिक संस्थांच्या माध्यमातून विविध वृक्षाची लागवड केली आहे.
आतापर्यंत 25 हजार झाडाची लागवड
विशेष म्हणजे हे वृक्ष निवडताना प्रशासनाने फुलपाखरू उद्यान, इको टुरिझम पार्क, पक्षी उद्यान, वटवाघुळ आणि खारुताई उद्यान, तलाव, नक्षत्र उद्यान, मधमाशी उद्यानासाठी पूरक होतील, अशा झाडांची निवड केली आहे. या उद्यानात बकुळ, करज, कडूनिंब, पेरू, मोहगनी, जांभूळ, आंबा, चेरी, कदंब, कांचन, बदाम, सातवीन, वड, पिंपळ, उंबर, ताम्हन, अर्जुन, काजू, सिसम, फणस, चिंच, कैलासपती, वावळा, खाया, बहावा, यासारख्या 25 प्रकारच्या सुमारे 25 हजार झाडाची लागवड आतापर्यंत करण्यात आली आहे.
फुलपाखरांच्या विणीचा हंगाम
फुलपाखरांना आकर्षित करणाऱ्या झाडाचे उद्दीष्ट साध्य झाले. फुलपाखरू उद्यानात दिवसभर विविध रंगाची फुलपाखरे या झाडाभोवती पिंगा घालत असून हा फुलपाखरांच्या विणीचा हंगाम असल्याने पुढील दोन महिन्यात या उद्यानात विविधरंगी फुलपाखराच्या गराड्यात निसर्गाचा आस्वाद घेता येणार आहे. तर दुसरीकडे अनेक जातीचे पक्षी आणि प्राणीही या निसर्ग उद्यानात विसावले असून या पक्षी प्राण्याच्या सानिध्यात निसर्गप्रेमी हरखून जात आहेत.
हेही वाचा - Navratri Special - तृतीयपंथीयांचाही १४ वर्षांपासून देवीचा जागर अवरितपणे सुरु