औरंगाबाद - 'हे चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे आपुल्या' हे ग.दि. माडगूळकरांचे गाणे आजच्या दिवसाला पूर्णपणे लागू होते, असे म्हटले तर वावग ठरता कामा नये, चिमणी काळाच्या ओघात दिसेनाशी झाली. कुठेतरी प्रत्येकाच्या बालपणाच्या आठवणींशी चिऊताई जोडली गेलेली आहे. चिमण्यांचा चिवचिवाट, कविता, बडबडगीते यांतच चिमणी ऐकायला मिळते. आज चिमणी दिवस. या दिनानिमित्त 'ईटीव्ही भारत'ने ज्येष्ठ पक्षिमित्र डॉ. दिलीप यार्दी ( Dilip Yardi information on Sparrow ) यांच्याशी खास बातचीत केली.
हेही वाचा - काकाच्या वाढदिवसाला भाजपचे पदाधिकारी उपस्थित, मात्र भाजपात प्रवेश केलेला पुतण्या हजर नसल्याचीच चर्चा अधिक
प्रश्न : चिमण्यांची संख्या कमी होत आहे का?
उत्तर : डॉ. दिलीप यार्दी - चिमण्यांची संख्या कमी झाली हे नक्की. मात्र, ही गोष्ट आपल्याला खूप उशिरा लक्षात आली. कारण की 2005 मध्ये लक्षात आले युरोपमध्ये 85 टक्के चिमण्या कमी झाल्यानंतर आपल्या भारतात लगेच पाच वर्षांनंतर लक्षात आले की, ग्रामीण भागातील 45 टक्के शहरी भागातील 80 टक्के चिमण्या कमी झाल्या आहेत. त्यामुळे, खूप उशिरा लक्षात आलेली ही गोष्ट आहे. पूर्वी चिमण्या माणसाच्या आजूबाजूला घराच्या परिसरात दिसायच्या. मात्र त्या आता कविता, गोष्टी व बडबड गीतेमधूनच ऐकायला मिळतात.
प्रश्न : मानवी जीवनात चिमण्यांचे महत्त्व आणि चिमण्यांचे वैशिष्ट काय?
उत्तर : डॉ. दिलीप यार्दी - माणसाचे जीवन मुळात चिमणीच्या सानिध्यात सुरू होते. पहाटे आपल्या घराच्या आजूबाजूला जेव्हा चिमण्या किलबिलाट करतात. परिसर आनंदमय झालेला असतो. अशा उत्साही वातावरणात आपण दिवसाची सुरुवात केल्यास कामे होतात, असा अनुभव आहे. बाळ रडत असेल तर त्यावेळी त्याला चिऊताई आली असे म्हटले तर ते शांत होते. माणूस आणि चिमणीचे निसर्गातील महत्त्व सांगायचे झाले तर, ते अविभाज्य घटक आहे, असे सांगता येऊ शकते. वाळवंटात देखील आपल्याला चिमणी बघायला मिळते.
प्रश्न : चिमण्यांचे कमी होण्यामागचे कारण काय?
उत्तर : डॉ. दिलीप यार्दी - मानवाने नेहमीची राहण्याची वृत्ती बदलून चंगळवादी कृती सुरू केली आहे आणि यामुळेच चिमण्या कमी व्हायला सुरुवात झाली. चिमण्यांचे कमी होण्याचे मुख्य कारण मानवाची बदललेली जीवनशैली, हे आपल्याला ठामपणे सांगता येईल. चिमण्या कमी होण्याचा विचार जर केला तर, भारतात घरात घरातील फोटो फ्रेमच्या मागे त्यांचे घरटे असायचे. नवीन वास्तू शास्त्राप्रमाणे घरे बांधण्यात येतात. गुळगुळीत घरात मच्छर देखील येऊ नये यासाठी लावलेल्या स्लाइडिंग खिडक्या यामुळे आपण चिमण्यांना घरातून हाकलून दिले. घरात राहणाऱ्या चिमण्यांना हाकलून दिले तर त्या राहतील कुठे. मी तर म्हणेन चिमण्यांना राहण्याची, खाण्याची आणि निवाऱ्याची सोय अत्यंत गरजेची आहे. तेच आपण हिरावून घेतली. त्यासोबतच घरासमोर अंगण राहिलेले नाही. अंगणात घासल्या जाणाऱ्या भंड्यातील खरकटे चिमण्यांचे अन्न होते. अंगण राहिले नाही. खरकट गटारात वाहून जाते. आपण पाणिसाठे कमी झाले. पूर्वी पुण्यकर्म म्हणून मूठभर दाणे टाकले जायचे, मात्र ते आता होत नाही. औरंगाबाद शहरातील पांदरी बाग येथील शेजारी चिंचेच्या झाडावर हजारो चिमण्या असायच्या. मात्र, आता त्या शेकडोने देखील दिसत नाही. त्यामुळे, मानवी जीवनात महत्त्वाच्या असलेल्या चिमण्या जगवायच्या असेल तर, त्यांच्यासाठी खाण्यापिण्याची आणि निवाऱ्याची सोय केली तर घटत जाणारी चिमण्यांची संख्या नक्कीच वाढेल.
दाणा, पाण्याची सोय केल्यास संख्या वाढेल
चिमण्या वाचवण्यासाठी आणि त्यांची संख्या वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. यासाठी चिमण्यांची कृत्रिम घरटी बनवण्याची कार्यशाळा शहरातील शाळांमध्ये आम्ही घेतली. यात विद्यार्थ्यांनी तब्बल तीन हजारांहून अधिक घरटी तयार केली. तयार केलेल्या घरट्यांचे आम्ही वाटप करून नागरिकांकडून वेळोवेळी त्या घरट्यात कोणत्या पक्षाने घरटे बनवले याची माहिती घेत आहोत. यातील ८० टक्के घरटी चिमण्यांनी स्वीकारली आहे. चिमण्यांसाठी प्रत्येकाने नियमित दाणा, पाण्याची सोय केल्यास घटत चाललेली चिमण्यांची संख्या नक्कीच वाढेल, असे डॉ. दिलीप यार्दी म्हणाले.
चिमण्या वाचवण्यासाठी हे कराव
- घराच्या आजुबाजूला कृत्रिम घरटे तयार करून बसवावे.
- घराच्या आजुबाजूला पक्षांसाठी देशी झाडांची लागवड करावी.
- पक्षांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.
- पक्षांसाठी त्यांना सुरक्षित वाटेल अशा ठिकाणी धान्याची व्यवस्था करावी.