औरंगाबाद - रविवारी सकाळी जळालेल्या अवस्थेत आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटली आहे. सुधाकर चिकटे असे मृताचे नाव असून, तो दारू पिऊन त्रास देत असल्याने पत्नीने आपला भाऊ आणि त्याची बायको, मुलाच्या मदतीने नवऱ्याचा काटा काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
रविवारी आढळून आला होता मृतदेह - रविवार 5 जुनच्या सकाळी हिमायत बाग परिसरात पोत्यात बांधून जळालेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला. मृताची ओळख पटत नव्हती आणि कुठलेही ठोस पुरावे नसताना गुन्हे शाखेने गुन्हा उघडकीस आणला. यात मृत सुधाकर चिकटे असून त्याला त्याची पत्नी आशा चिकटे, तिचा भाऊ राजेश मोळवंडे, पत्नी अलका मोळवंडे, मुलगा युवराज मोळवंडे यांनी केल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दारुड्या नवऱ्यामुळे पत्नी होती त्रस्त - मृत सुधाकर चिकटे हिमयात बाग परिसरात सांगळे कॉलनी येथे राहत होते. तिथे त्यांचे किराणा दुकान आणि पिठाची गिरणी होती. हे दोनही व्यवसाय पत्नी आशा चिकटे सांभाळत होती. सुधाकर दारूच्या आहारी गेला होता. काही दिवसांपासून तो सकाळपासून दारूच्या नशेत तर्र असायचा. त्यात तो पत्नीला शिवीगाळ आणि मारहाण करत होता. त्यामुळे पत्नी आशा त्रस्त झाली होती. आपला तिच्याच घराच्या वरच्या मजल्यावर राहणारा तिचा आणि राजेश माळवंडे याला आपली व्यथा सांगितली. त्यावेळी सुधाकरला संपवण्याचे षडयंत्र शिजले.
बहिणीला भावाच्या कुटुंबियाने दिली साथ - सुधाकरचा काटा काढायचे ठरले, त्यासाठी आशा आणि तूचा भाऊ राजेश यांनी लोखंडी रॉड आणून ठेवला. सुधाकर शनिवारी रात्री जेवण केल्यावर सोफ्यावर बसले होते. त्यावेळी राजेशने मागून लोखंडी रॉडने डोक्यात वार केले. त्यामुळे सुधाकरचा जागीच मृत्यू झाला. सुधाकरचा आवाज ऐकून वरच्या मजल्यावरून राजेशची पत्नी अलका आणि मुलगा युवराज पळत आले. मृतदेह टाकण्यासाठी किराणा दुकानातून गोणी आणून दिली. राजेश आणि युवराजने मोपेडवर मृतदेह ठेवत हिमायत बाग डोंगर गाठला. निर्मनुष्य ठिकाणी पेट्रोल टाकून सुधाकर यांचा मृतदेह ओळख पटू नये म्हणून जाळून टाकला.
कुठलेही ठोस पुरावे नसताना पोलिसांनी केली कामगिरी - रविवारी सकाळी मृतदेह आढळून आले असता, मृताची ओळख पटवणे अवघड होते. मात्र, पोलिसांनी तपास सुरु केला. सांगळे कॉलनीत एका रस्त्यावर रक्ताचे डाग असल्याचे दिसून आले. सीसीटीव्हीमध्ये पांढऱ्या रंगाची मोपेड जाताना दिसून आली होती. त्या आधारावर सांगळे कॉलनीत पांढरी मोपेडचा शोध घेत, पोलीस चिकटे यांच्या घराजवळ पोहचले. परिसरात कोणी बेपत्ता आहे का याबाबत विचारपूस केली असता सुधाकर दोन दिवस झाले घरी येत नसल्याचे कळले. पोलीस सुधाकरच्या घरी गेले असता त्यांच्या मुलाने मामाने वडिलांना मारल्याची माहिती दिली आणि खुनाचा उलगडा झाला. गुन्हे शाखा पोलिसांनी कारवाई करत चार आरोपींना ताब्यात घेतले.