औरंगाबाद - मंगळवारी लॉकडाऊनमुळे अडकलेल्या कामगारांना गावी पाठवण्यासाठी झारखंडला एक रेल्वेगाडी पाठवण्यात आली. 1474 कामगारांना या रेल्वेने पाठवण्यात आले. मात्र, यावेळी एक अनोखा अनुभव मजूरांना आला. रेल्वे वेळेत निघाली. मात्र, काही मजूर उरल्याने ते रेल्वेमागे धावत असल्याचं दिसलं. आणि इतर वेळी एकदा निघाल्यानंतर कधीही न थांबणारी रेल्वे मजूरांना घेण्यासाठी थांबली; आणि मजूरांना घेऊनच निघाली. औरंगबादच्या रेल्वे स्थानकावर हा सुखद क्षण उपस्थितांना अनुभवायला मिळाला.
गाडीची वेळ झाल्याने गाडी निघाली; याचवेळी चार मजूर पळत आले. आणि त्यांच्यासाठी गाडी थांबवण्यात आली. मजुरांची वैद्यकीय तपासणी आणि कागदपत्रांची पूर्तता करून या लोकांना घेतल्यानंतरच गाडी झारखंडसाठी रवाना करण्यात आली.
औरंगाबाद रेल्वेस्थानाकावरून मागील काही दिवसांपासून देशातील विविध ठिकाणी रेल्वेगाड्या सोडण्यात येत आहेत. औरंगाबादसह अन्य भागात लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या लोकांना गावी जाता यावं, यासाठी विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत. मंगळवारी झरखंडसाठी अशीच रेल्वे सोडण्यात आली. या गाडीतून 1474 लोकांना पाठवण्यात आले. गाडी प्लॅटफॉर्म वरून निघाली असताना अचानक चार मजूर रेल्वेमागे धावू लागले. हे पाहून रेल्वे पोलीस आणि अधिकाऱ्यांना त्यांना थांबवलं; आणि रेल्वे थांबवण्याचे आदेश दिले. मजुरांचे कागदपत्र तपासून त्यांना गाडीत बसवण्यात आले; आणि गाडी सोडण्यात आली. एखाद्या व्हीआयपी व्यक्तीसाठी रेल्वे थांबण्याचे प्रकार कानावर येतात. मात्र सर्वसामान्यांसाठी अशी घटना क्वचितच घडते. परंतू, संचारबंदीच्या या परिस्थितीत मजुरांचे हाल पाहता रेल्वे अधिकाऱ्यांनी माणुसकी जपली, आणि रेल्वे थांबली.
जाण्यासाठी कोणीही अशी घाई करू नये, एखादा दिवस उशिरा का होईना, मात्र सर्वांना घरी सोडण्याची व्यवस्था करण्यात येईल, असे आवाहन पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी केलंय.