औरंगाबाद - दीड कोटींचा आयकर बुडविल्याची तक्रार आल्याचे धमकावून तोतया आयकर अधिकाऱ्याने एका व्यावसायिकाला ६० लाखांच्या खंडणीची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात तोतया आयकर अधिकाऱ्यासह तिघांचा पर्दाफाश करण्यात आला आहे. खुद्द बांधकाम व्यवसायिकानेच या खंडणीप्रकरणाचे स्टिंग आॅपरेशन करुन पोलिसांना व्हिडिओ दिले आहेत. याप्रकरणी गुरुवारी जवाहरनगर पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. अरविंद जवळगेकर, संजय पारख आणि महेश चौधरी (तिघेही रा. बीड बायपास परिसर) अशी त्यांची नावे आहेत. त्यापैकी चौधरी यांना ताब्यात घेतल्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी सांगितले.
बांधकाम व्यावसायिक सुशांत दत्तात्रय गिरी (३५, रा. घर क्र. ६३, शिवशंकर कॉलनी, तानाजी चौक) यांचे संजय पारख हे मित्र आहेत. ७ आॅगस्ट रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास पारख यांनी गिरींना संपर्क साधून तुम्ही दीड ते दोन कोटींचा आयकर बुडविल्याची तक्रार आयकर विभागाला करण्यात आली असल्याचे सांगितले. तसेच ही तक्रार आयकरचे अधिकारी अरविंद जवळगेकर यांच्या टेबलवर करण्यात आली असून ते माझे जवळचे मित्र आहेत. तेव्हा तुम्हाला हे प्रकरण मिटवायचे असल्यास भेटायला बोलवा, असे सांगितले. त्यानुसार गिरी यांनी १० आॅगस्ट रोजी बीड बायपासवरील झाल्टा फाट्यावर असलेल्या हॉटेल बासू येथे भेट घेण्याचे निश्चित झाले. त्यानंतर पारख हे ठरलेल्या दिवशी गिरी यांना घेऊन भेटीच्या ठिकाणी दाखल झाले. तेव्हा जवळगेकर हे सुरुवातीपासूनच महेश चौधरी यांच्यासोबत तेथे बसलेले होते. तेथे पारख यांनी दोघांची ओळख करुन दिली.
पारख यांनी ओळख करुन देताना जवळगेकर हे आयकर अधिकारी, तर चौधरी हा त्यांचा स्वीय सहायक असल्याची थाप मारली होती. त्याचवेळी जवळगेकर यांनी गिरींना धमकावत तुमच्याविरुद्ध आयकर बुडविल्याची तक्रार आली आहे. जवळपास दीड ते दोन कोटींचा आयकर बुडविल्याचे त्यात म्हटल्याचे ही सांगितले. हे ऐकून गिरी यांना धक्का बसला. त्यांनी मुळात एवढ्या मोठ्या रकमेचे आपण कामच करत नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आयकर बुडविण्याचा संबंधच नसल्याचेही गिरी यांनी या तिघांना सांगितले.
६० लाखांची तडजोड ४० लाखांवर-
गिरी यांच्याकडे १० आॅगस्ट रोजी ६० लाखांची खंडणी मागितलेल्या जवळगेकर यांनी बोलणीसाठी पारख यांना पाठविले. ११ आॅगस्टला पारख यांनी पुन्हा गिरी यांना बीड बायपासवरील एका हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले. तेथे गिरी यांनी छुप्या कॅमेराने रेकॉर्डिंग केली. तेव्हा पारख यांनी ४५ लाख रुपये द्यावेच लागतील, असे सुनावले. तेवढी रक्कम होत नसेल तर येथेच थांबू असेही धमकावले. विशेष म्हणजे पारख यांनी गिरींच्या समोरच चौधरी यांना मोबाइलवर संपर्क साधून ३५ लाखांतच तडजोड करा, अशी मागणी करत असल्याचे सांगितले. तेव्हा चौधरी यांनी मी सोलापूरला आहे. आता ४५ लाखांच्या खाली एक रुपया देखील कमी होणार नाही असे पारख यांना सांगून विषय सोडून द्या, असेही सांगितले. त्यानंतरही बराचवेळ झालेल्या चर्चेनंतर ४० लाख रुपयात तडजोड ठरली.
पोलीस आयुक्तांकडे तक्रारी अर्ज-
बांधकाम व्यावसायिक गिरी यांनी १८ आॅगस्ट रोजी पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांच्याकडे तक्रारी अर्ज दिला. हा अर्ज जवाहरनगर पोलिसांना १९ आॅगस्ट रोजी प्राप्त झाला. त्यानंतर पोलीस निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक वसंत शेळके यांनी तक्रारी अर्जाच्या चौकशीला सुरुवात केली. मात्र, या प्रकरणात गुन्हाच दाखल होत नसल्याचे पाहून गिरी यांनी प्रसार माध्यमांशी संपर्क साधला. हे प्रकरण प्रसार माध्यमातून समोर आल्यानतंर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशावरुन दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणात आरोपी महेश चौधरी याला ताब्यात घेण्यात आले आहे.
तो अधिकारी विमा एजंट-
याप्रकरणातील तिघेही आरोपी वेगवेगळे व्यावसायिक आहेत. आयकर अधिकारी अशी ओळख करुन दिलेले जवळगेकर हे विमा एजंट आहेत. तर ताब्यातील महेश चौधरी यांचे बीड बायपासवरील म्हस्के पेट्रोल पंपासमोर पुलाव नावाने हॉटेल आहे. चौधरी हे भाजपचे पदाधिकारी आहेत. तसेच, गिरी यांचे मित्र संजय पारख हे प्रॉपर्टी एजंट आहेत. पोलीस आता या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.