औरंगाबाद - बीबी का मकबरा समोरील जागेवर नागरिकांनी दावा दाखल केला होता. याबाबत मकबऱ्या समोरील जागेबाबत दाखल मनाईहुकूम दावा औरंगाबाद सहदिवाणी न्यायाधीश (वरिष्ठस्तर) पी. आर. शिंदे यांनी खारीज केला. मकबऱ्या समोरील जमीन सिटी सर्वे क्रमांक 172 सीटीएस क्रमांक 1635 निजाम काळापासून आपली वडिलोपार्जित मिळकत असल्याचा दावा जयराज पांडे यांनी केला होता.
काय होते पट्टेदार....
मकबऱ्या समोरील जागेवर असलेले अतिक्रमण पुरातत्व विभागाच्या मागणीनंतर महापालिकेने पाडले. त्यावेळी मकबरा समोरील त्या मिळकतीचा मी पट्टेदार आहे, असा दावा जयराज पांडे यांनी केला होता. तेलंगाणात जमीन महसूल कायद्यातील व्याख्येनुसार भाडेपट्ट्याच्या मिळकतीचा भाडेपट्टा म्हणजे जमीन महसूल भरण्यासाठी जबाबदार असलेली व्यक्ती. त्याच्या नावाची तशी नोंद महसूल रेकॉर्डमध्ये असते. ती म्हणजे पट्टेदार अशी माहिती पुरातत्व विभागाचे वकील अॅड. रामदास भोसले यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.
मोडी भाषेतील पुरावे केले होते सादर....
पुरातत्व विभागाने माझ्या मालकीच्या जमिनीवर हस्तक्षेप करू नये, असा मनाई हुकूम देण्याची विनंती जयराज पांडे यांनी केली होती. त्यांनी पट्टेदार असल्याची मोडी भाषेतील कागदपत्रे न्यायालयात दाखल केली होती. पुरातत्व विभागाच्या वतीने अॅड. रामदास भोसले यांनी म्हणणे मांडत 1951 मध्ये मराठवाड्यातील ऐतिहासिक वास्तू आणि त्याच्या लगत असलेल्या जमिनी पुरातत्व विभागाकडे सोपवण्यात आल्या होत्या, अशी माहिती दिली.
1971 ला कुळ कायदा रद्द होऊन नवीन कायदा अस्तित्वात आला. तेव्हापासून शहर भूमापन कार्यालय पीआर कार्ड आणि चौकशी रजिस्टरमध्ये पुरातत्व विभागाच्या नावाची नोंद आणि मालकी हक्क आहे. जमिनीवर दावा केलेले जयराज पांडे यांची कुठलेही पट्टेदार म्हणून नोंद नाही, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी सुनावणी अंती न्यायालयाने पट्टेदार त्यांच्या जमिनीचा मालक होऊ शकत नाही, असा निर्वाळा देत याचिका खरीज केली. त्यामुळे आता ही जमीन पुरातत्व विभागाची असल्याचे निष्पन्न झाले आहे.