औरंगाबाद- थकीत बिलापोटी महावितरणने महानगरपालिकेच्या शाळांचा वीज पुरवठा खंडित केल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादमध्ये घडला. महावितरणने जवळपास 10 शाळांची वीज कापल्याने विद्यार्थ्यांवर आता अंधारात अभ्यास करण्याची वेळ आली आहे.
चिखलठाणा, नारेगाव अशा भागांमधील शाळांची वीज खंडित करण्यात आली आहे. वीज खंडित झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. वीज खंडित झालेल्या बऱ्याच शाळांमध्ये ई-लर्निंग शिक्षण प्रणाली आहे. मात्र, वीज नसल्याने ही प्रणाली अक्षरशः बंद पडली आहे. त्यामुळे गरिबीत शिक्षण घेणाऱ्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. औरंगाबाद महानगरपालिकेच्या शाळांचा वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती समोर आली असताना 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने चिखलठाणा परिसरातील महानगरपालिकेच्या शाळेत जाऊन अधिक चौकशी केली.
महानगरपालिकेच्या चिखलठाणा येथील शाळेत साडेपाचशे विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळेत तीन वर्गांमध्ये ई-लर्निंग प्रणालीने विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. शाळेत सीसीटीव्ही बसवलेले आहेत. मात्र, अत्याधुनिक अशी शिक्षण प्रणाली गेल्या आठ दिवसांपासून धूळ खात पडली आहे. कारण शाळेची वीज महावितरणने खंडित केली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून शाळेच्या वीज बिलाचे सदोतीस हजार रुपये थकीत आहेत. महानगरपालिकेने वीज बिल भरले नसल्याने महावितरणने वीज खंडित केली आहे. वीज खंडित केल्यावर मुख्याध्यापकांनी महानगरपालिका, महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. चार दिवस पाठपुरावा करूनही वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. वर्गांमध्ये अंधुक प्रकाश असल्याने पुस्तकातील अक्षरेही वाचण्यास अडचण होत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली. याबाबत महापौरांना विचारणा केली असता, महावितरणने कुठलीही कल्पना न देता वीज खंडित केली आहे. महिन्याला चार कोटी रुपयांचा भरणा महावितरणला करतो, त्यात उशीर झाला तर दंडासहित रक्कम भरली जाते. शाळेची वीज नियमाने कापत येत नाही. महावितरण विरोधात आम्ही पोलीस तक्रार करू शकतो. महावितरण अधिकाऱ्यांनी वीज पुरवठा सुरळीत करतो असे आश्वासन दिले होते. मात्र, ते का झाले नाही याबाबत तातडीने माहिती घेऊन वीज पुरवठा जोडण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.
एकूणच महानगर पालिकेच्या शिक्षण विभागाला आणि महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना गरीब मुलांच्या शिक्षणाबाबत काही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. महानगरपालिकेच्या चिखलठाणा येथील शाळेचा आढावा घेतला 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी.