गंगापूर(औरंगाबाद)- औरंगाबादच्या गंगापूरमध्ये शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास अचानकपणे वातावरणात बदल होऊन सोसाट्याचा वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरवात झाली. अचानकपणे आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. तालुक्यातील अनेक ठिकाणी सायंकाळी रोहिणी नक्षत्राच्या मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. मान्सूनपूर्व मशागतीला वेग आलेला असताना झालेल्या या पावसामुळे मशागतीची कामे दोन ते तीन दिवस खोळंबणार आहे.
अचानक आलेल्या पावसाने उडाली धांदल -
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार दुपारपासून वातावरणात बदल होऊन उकाडा जाणवत होता. यातच चारच्या सुमार ढग दाटुन येत सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरवात झाली. पावसामुळे काही ठिकाणी झाड्याच्या फांद्या कोसळण्याच्या घटना समोर आल्या आहेत. जोरदार पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांची पळापळ झाली. मात्र, मान्सूनपूर्व जोरदार पावसाने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य पाहायला मिळाले.