औरंगाबाद - लॉकडाऊनचे पालन नागरिक करत नसल्याने पोलिसांनी कडक अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. शहरात अनेक ठिकाणी पोलिसांनी आता कारवाईला सुरुवात केली आहे. विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. इतकेच नाही तर अनावश्यक फेरफटका मारणाऱ्यांची वाहने जप्त केली जात आहेत. या कारवाईमुळे तरी नागरिक घरी राहतील, अशी अपेक्षा पोलीस व्यक्त करत आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यात एक दिवसाआड बाजारपेठा काही तासांसाठी उघडल्या जात आहेत. सम तारखेला बाजार उघडला जात असताना विषम तारखेला अनेक नागरिक विनाकारण रस्त्यावर दिसून येतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. बेफिकीर नागरिकांकडून दंड वसूल केला जात असून लॉकडाऊनच्या काळात 50 लाखांपेक्षा जास्त दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
औरंगाबादेत कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा, यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. लोकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी सम आणि विषम, असे वर्गीकरण करून बाजारपेठ उघडण्यास परवानगी देण्यात आली. मात्र, नागरिक काही ना काही कारण काढून रस्त्यावर येत आहेत. औरंगाबादमध्ये सध्या कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. ही साखळी थांबवण्यासाठी नागरिकांनी घरात राहणे गरजेचे आहे. मात्र, नागरिक नियमांचे पालन करत नसल्याने पोलिसांनी कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. लॉकडाऊनच्या काळात विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर कारवाई सुरू केली आहे. प्रत्येक चौकात नाकाबंदी करून फिरणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. तर काही वेळा वारंवार सांगूनही ऐकत नसलेल्या नागरिकांची वाहने जप्त केली जात आहेत.
कारवाईच्या भीतीने तरी लोक घरी बसतील, ही संचारबंदी लोकांसाठी आहे, लोक घरात बसले तरच आपण कोरोनाला हरवू शकतो. त्यामुळे नागरिकांनी घरीच राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.