औरंगाबाद - बांगलादेशी, पाकिस्तानी नागरिक दाखवा आणि पाच हजार रुपयांचे बक्षीस मिळवा, अशी योजना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सुरू करण्यात आली आहे. औरंगाबाद शहरात विविध ठिकाणी तशा प्रकारचे फलक मनसेतर्फे लावण्यात आले आहेत. असे नागरिक शोधून त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करणार असल्याची घोषणा मनसे नेत्यांनी केली आहे.
देशात सीएए आणि एनआरसी कायदा लागू करण्यात आला. त्यानंतर देशात दोन मतप्रवाह निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे. भाजप सोडता सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी या कायद्याचा विरोध केला आहे. असे असले तरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र कायद्याचे समर्थन केले आहे. त्याच धर्तीवर आता मनसेकडून ही मोहीम राबवण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यभर बक्षिसांचे फलक लावण्यात येणार असल्याचे मनसे नेत्यांनी सांगितले.
हेही वाचा... CAA हिंसाचार: दिल्लीतील अमेरिकन, फ्रान्स, रशियन नागरिकांना सतर्कतेचा इशारा
देशात मोठ्या प्रमाणात घुसखोर असून त्यांना बाहेर काढणे गरजेचे आहे. बाहेरून आलेले घुसखोर देशात दहशत माजवत आहेत. सध्या दिल्लीत जे सुरू आहे, अशा घटना होऊ नयेत यासाठी बक्षीस योजना जाहीर करण्यात आली असल्याचे मनसे नेत्यांनी सांगितले.
पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिकांचा शोध घेणे गरजेचे आहे. यात सर्वसामान्य नागरिकांनी मदत करावी. त्यासाठी असे नागरिक पुराव्यासह दाखवणाऱ्यास पाच हजारांचे बक्षीस मनसेतर्फे देण्यात येणार आहे. मिळालेली माहिती पोलिसांना देऊन अशा लोकांना परत त्यांच्या देशात पाठवू अशी भूमिका मनसेतर्फे जाहीर करण्यात आली असल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी सांगितले.