औरंगाबाद - शिवसेनेमध्ये ( Shivsena ) झालेल्या बंडानंतर पक्षाची अवस्था जर्जर झाल्यासारखी आहे. एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्यासोबत तब्बल 40 बंडखोर आमदार गेले आहेत. त्यामुळे आता मूळ शिवसेनेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यामुळे शिवसेना पक्षासोबत असलेल्या कार्यकर्त्यांकडून शिवसेनेने चक्क बॉण्ड पेपरवर लिहून घेणे सुरू केले आहे. औरंगाबादमध्ये ( Aurangabad ) हा प्रकार सुरू झाला असून शेकडो कार्यकर्त्यांना आपण शिवसेनेशी एकनिष्ठ असल्याचे प्रतिज्ञापत्रावर लिहून द्यावे लागले आहे. पक्षासोबत कितीजण आहेत याचीच चाचपणी औरंगाबादेत शिवसेनेकडून सुरू असल्याचे बोलले जात आहे.
जिल्ह्यातील पाच आमदारांनी केले बंड - औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेच्या पाच आमदारांनी शिवसेनेशी बंड करून एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होत सत्ता परिवर्तन घडवून आणले. त्यानंतर शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात मोठे खिंडार पडल्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, आमदार जरी गेले तरी जिल्ह्यातील शिवसैनिक हे शिवसेनेसोबतच आहेत असे दाखविण्यासाठी आता शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून बॉण्डवर लिहून एकनिष्ठ असल्याचा पुरावा घेतला जात आहे.
100 रुपयांच्या बॉण्डवर एकनिष्ठतेचे प्रमाणपत्र ? - शिवसेनेत असेलेले किती पदाधिकारी पक्षासोबत आहेत याची चाचपणी केली जात आहे. त्यासाठी 100 रुपयांच्या बॉण्ड पेपरवर शपथपत्र देण्यास सांगण्यात आले आहे. या प्रतिज्ञापत्रात आम्ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहोत. आम्हाला पक्षाची घटना मान्य असून आमचे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास असून आमचा बिनशर्थ पाठिंबा आहे, असे कार्यकर्त्यांना लिहून द्यावे लागत आहे. मात्र, असे बॉण्डवर लिहून शिवसेनेशी एकनिष्ठ असल्याचे प्रमाणपत्र देता येते का, अशीही चर्चा औरंगाबादमध्ये सध्या सुरू आहे.
हेही वाचा - India Floods : गुजरात, आसाम, कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेशसह जवळपास अर्धा देश पुराच्या विळख्यात
हेही वाचा - BJP's Mission 134 on BMC Election : मुंबई महापालिकेवर भाजपचा महापौर बसवण्याचे लक्ष्य; भाजपचे मिशन 134
हेही वाचा - MLA Bhaskar Jadhav questions PM : भाजपने रडीचा डाव खेळत आमदार फोडले-भास्कर जाधव