औरंगाबाद - माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि मनसेतून शिवसेनेत आलेले शिवसैनिक प्रकाश महाजन यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे. जाधव आणि महाजन यांच्या पक्ष प्रवेशामुळे त्यांची घरवापसी झाली आहे. तर, कट्टर शिवसैनिक मानले जाणारे सुहास दशरथे यांनी देखील मनसेत प्रवेश केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत या नेत्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.
हेही वाचा... 'केंद्र सरकारचे 'हम करे सो कायदा' हे धोरण देशात चालणार नाही'
हर्षवर्धन जाधव हे काँग्रेसला रामराम ठोकत 2009 मध्ये मनसेच्या तिकिटावर औरंगाबाद कन्नड विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. मात्र, त्यानंतर 2014 मध्ये मनसेला सोडचिठ्ठी देऊन त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तेथे मतभेद झाल्यानंतर त्यांनी स्वतःचा 'शिवस्वराज्य बहुजन पक्ष' स्थापन केला होता. जाधव यांनी स्वतःच्या पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवल्याने शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाल्याचे मानले जात आहे.
हेही वाचा... शिवसेनेत बच्चू कडू विरुद्ध अब्दुल सत्तार, ...तो अधिकार सत्तारांना नाही
मनसेची स्थापना होत असताना भाजपमधून मनसेत गेलेले प्रकाश महाजन राज ठाकरे यांच्या कार्यशैलीवर नाराज झाल्यानंतर मधल्या काळात शिवसेनेत गेले होते. तेच प्रकाश महाजन पुन्हा मनसेत दाखल झाले आहे. त्याचप्रमाणे औरंगाबादमधील कट्टर शिवसैनिक मानले जाणारे सुहास दशरथे यांच्यासह त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी मनसेत जाहीर प्रवेश केला आहे. राज्यात महाविकास आघाडी निर्माण होताच मनसे नव्या जोमाने समोर येणार, अशी चर्चा सुरू झाली. त्यावेळी शिवसेनेसह इतर राजकीय पक्षातील नाराजांसोबत राज ठाकरे यांनी चर्चा केली. त्यानंतर अनेक नाराज कार्यकर्ते मनसेत प्रवेश करणार, याचे संकेत मिळाले होते. औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेत झालेल्या इनकमिंगमुळे मनसे मोठ्या तयारीने निवडणुकीत उतरणार असल्याचे नक्की मानले जात आहे.