वैजापूर (औरंगाबाद) - राज्याच्या सेनेच्या नगरविकास मंत्र्यांनी शहरातील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणासाठी भरघोस निधी मंजूर केल्याचे डिजिटल फलक शहरात ठिकठिकाणी झळकले खरे, परंतु या डिजिटल फलकावरून सेनेच्या अब्दुल सत्तार व संदीपान भुमरे या दोन मंत्र्यांची छायाचित्रे हद्दपार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, महाआघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना फलकावर आवर्जून स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे, याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे.
![Abdul Sattar photo absent on shivsena digital poster](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/12879298_th.jpg)
हेही वाचा - पोषण आहाराबाबत सरकारचा निर्णय योग्य, औरंगाबाद खंडपीठाचे निर्देश
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या छायाचित्रांना स्थान
याबाबत अधिक माहिती अशी की, राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील टिळकपथसह छत्रपती शिवाजी महाराज व जुन्या स्टेट बँकेच्या रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणासाठी तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्या प्रित्यर्थ सेनेच्यावतीने आभार व्यक्त करण्याच्या उद्देशाने शहरात ठिकठिकाणी डिजिटल फलक लावण्यात आले आहेत. फलक लावण्यात आले खरे, परंतु या फलकावरून अब्दुल सत्तार व संदीपान भुमरे या दोन सेनेच्या मंत्र्यांच्या छायाचित्रांना स्थान न देता त्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या दोन्हीही मंत्र्यांचे मातोश्रीवर चांगले वजन आहे. याशिवाय ते जिल्ह्यातील मंत्री आहेत. असे असतानाही सेनेने त्यांना फलकावरून हद्दपार केले आहे. त्याउलट राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ व काँग्रेसचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या छायाचित्रांची फलकावर वर्णी लावण्यात आली आहे.
सेनेच्या स्थानिक नेत्यांचीही छायाचित्रे, मात्र 'त्या' दोन मंत्र्यांना डावलले
सेनेच्या वरिष्ठ नेत्यांसह स्थानिक नेत्यांचीही छायाचित्रे आवर्जून लावण्यात आली आहे. परंतु, या दोन मंत्र्यांना सेनेने डावलले आहे. त्यामुळे, यासंदर्भात राजकीय वर्तुळात चर्वितचर्वण सुरू आहे. साधारणतः महिनाभरापूर्वीच महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे वैजापूर येथे खासगी कार्यक्रमांच्या उद्घाटनासाठी आले होते. सत्तार यांनी सेनेचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान उपनगराध्यक्ष साबेरखान यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे दोघांतील वाद टोकापर्यंत जाऊन प्रकरण अर्वाच्य शिवीगाळ करण्यापर्यंत गेले. त्यानंतर सेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी समाज माध्यमांवर सत्तारांविरुद्ध खालच्या पातळीवर जाऊन पोस्ट व्हायरल करून रोष व्यक्त केला. तेव्हापासून सेनेचे स्थानिक नेते, पदाधिकारी व सत्तारांमध्ये वादाची ठिणगी पडली. याशिवाय सत्तार यांनी काँग्रेसचा हात सोडून जरी सेनेचा धनुष्यबाण हाती घेतला असला तरी, त्यांचा अजूनही काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या स्थानिक नेत्यांशी घरोबा आहे.
सत्तारांची अजूनही सेनेच्या स्थानिक नेत्यांशी पाहिजे तशी नाळ जोडली गेली नाही
काँग्रेसचे नेते भाऊसाहेब ठोंबरे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी, मर्चंट बँकेचे माजी चेअरमन बाळासाहेब संचेती यांच्याशी असलेले मधूर संबंध तालुक्यात सर्वश्रुत आहेत. सत्तार वैजापूर येथे आल्यानंतर सेना नेत्यांच्या घरी जाणे एकवेळ टाळतील, परंतु या जुन्या मित्रांच्या घरी आवर्जून जातात. त्या तुलनेत सत्तारांची अजूनही सेनेच्या स्थानिक नेत्यांशी पाहिजे तशी नाळ जोडली गेली नाही. हीच बाब सेनेच्या स्थानिक नेत्यांनाही खटकते. त्यामुळे, सत्तार आणि सेनेच्या स्थानिक नेत्यांमध्ये मधूर संबंध केव्हा प्रस्थापित होतात, हे आज सांगणे मात्र कठीण आहे.
..तेव्हापासून सेनेच्या स्थानिक नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये सत्तारांबाबतचे मत कलुषित
गेल्या महिन्यात जो राडा झाला. तेव्हापासून सेनेच्या स्थानिक नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये सत्तारांबाबतचे मत कलुषित झाले. त्यामुळेच की काय, सेनेने डिजिटल फलकावरून सत्तारांना हद्दपार केले. सत्तारांबाबत समजू शकते. परंतु दुसरीकडे संदीपान भुमरे हे सेनेचे जुने नेते व सध्या मंत्री आहेत. त्यांचे फलकावरून छायाचित्र डावलण्याचे कारण मात्र समजू शकले नाही. फलकावर कुणाचे छायाचित्र लावायचे. ही वैयक्तिक व खासगी बाब असली तरी जिल्हा व पक्षातील मंत्री असूनही या दोन मंत्र्यांची छायाचित्रे फलकावरून का डावलण्यात आली? याची जिज्ञासा मात्र शहरातील सामान्य नागरिकांसह अन्य राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.