औरंगाबाद - शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर शिंदे गटात गेल्याची माहिती समोर आली असल्याने हा सेनेला मोठा धक्का मानला जात आहे. दोनच दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांच्या संवाद यात्रेदरम्यान अर्जुन खोतकर ( Arjun Khotkar ) यांनी बंडखोरांना उंदराची उपमा दिली होती. तर सोमवारी ( आज ) दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांची भेट घेतली. विशेष म्हणजे यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे देखील सोबत असल्याने चर्चांना उधाण आले आहे.
शुक्रवारी खोतकरांनी घेतला होता बंडखोरांचा समाचार : शुक्रवारी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर असताना संत एकनाथ रंग मंदिर येथे झालेल्या संवाद दौऱ्यात जालन्याचे शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी भाषण करून बंडखोर आमदारांना उंदराची उपमा दिली. त्यांचा बंदोबस्त करू. एखाद्या कुटुंबासोबत निष्ठा आणि प्रेम ठेवण्याची परंपरा आहे. त्यात कधी गांधी, कधी पवार कुटुंबियांवर प्रेम करणारे लोक आपल्याकडे आहेत. तसच आम्ही ठाकरे कुटुंबात प्रेम आणि निष्ठा ठेवतो. या मराठवाड्यात शिवसेना मजबुत करू, असे खोतकर यांनी सांगितले. तर सध्या उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची अवस्था महाभारतातील अर्जुनासारखी झाली आहे. सगळेच आपले आहेत. मात्र शस्त्र उचलावी लागतील. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे न्यायचे काम करायचे, असे म्हणत शिवसेनेच्या अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाचा संदेश देत आपण शिवसेनेचे एकनिष्ठ असल्याचे सांगितले.
'मी शिवसेनेतच' : दिल्ली येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत अर्जुन खोतकर यांनी भेट घेतली. त्यावेळी जालना जिल्ह्यात कट्टर विरोधक असलेले केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे देखील सोबत होते. त्यामुळे चर्चा रंगल्या असताना मी अद्याप सेनेसोबत आहे आणि कायम राहणार असे अर्जुन खोतकर यांनी सांगितले असले तर आमच्यात असणारे वाद मिटवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी बोलावले, असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले. त्यामुळे सेनेचा अर्जुन शिंदे गटाच्या गळाला लागला आहे का? असे प्रश्न उपस्थितीत होत आहेत.
हेही वाचा - Former Minister Arjun Khotkar : जालनामध्ये शिवसेनेला भगदाड; अर्जुन खोतकर यांचा शिंदे गटात जाहीर प्रवेश?