औरंगाबाद - राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून ही चिंतेची बाब आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये रुग्ण वाढल्याने पुन्हा लॉक डाऊनचा निर्णय घ्यावा लागला. असे निर्णय घेण्याची गरज पडू नये असे वाटत असेल तर नियमांचे पालन करावे लागेल. अन्यथा लॉक डाऊनचा कठोर निर्णय घ्यावा लागू शकतो असा इशारा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिला. मुंबईत रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे, त्याच बरोबर सर्वच बाबतीत सूट दिली आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन देखील टोपे यांनी पत्रकार परिषदेत केले.
कामचुकार पणा केल्यास कारवाई -
ट्रेकिंग करणे, ट्रेसिंग करणे आणि उपचार करणे, तपासणी वाढवणे अशा सूचना केंद्रीय समितीने दिल्या आहेत. त्यांचे पालन आम्ही करत आहोत. तपासणी वाढवण्याच्या सूचना आम्ही केल्या आहेत. मात्र, जे अधिकारी निदान करणे, उपचार करणे आणि संपर्कात आलेल्या लोकांचे निदान करत नाहीत. असा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे संकेत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले.
अर्थसंकल्पात आरोग्य सेवेला वाढीव निधी द्यावा -
अर्थसंकल्पात आम्हाला 4500 कोटी रुपये हॉस्पिटल बांधकामासाठी लागणार आहे. त्याची मागणी आम्ही केली या एशियन बँक राज्य सरकारला कर्ज देणार आहे. त्यातून आरोग्य विभागाला मदत होईल. नियमानुसार आरोग्यावर जीडीपीच्या पाच टक्के खर्च द्यायला हवा. तो आजपर्यंत एक टक्के इतका होता. त्यामुळे परिस्थिती पाहता आम्हाला भरीव निधी मिळेल ही अपेक्षा असल्याचे देखील राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आजपासून लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. दुसरा डोस देण्यात येतोय, कोविन अँप मध्ये कुठलाही दोष नाही. ज्यांनी मॅन्युअल पद्धतीने आपली माहिती दिली आहे. त्यांना त्याच पद्धतीने पुन्हा नोंदणी करावी लागणार आहे. यात कुठलाही दोष नाही असा खुलासा राजेश टोपे यांनी केला.