औरंगाबाद : औरंगाबाद शहर औद्योगिक विकसित शहर आहे. अनेक उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात येणार आहेत. त्यामुळे शेंद्रा आणि वाळूज या दोन औद्योगिक वसाहतींना जोडण्यासाठी मेट्रोचा डीपीआर तयार केला जात असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. इतकंच नाही तर त्याचबरोबर मोठा उड्डाणपूल तयार करण्याबाबतही डीपीआर करण्याच्या हालचाली सुरू आहेत असे त्यांनी सांगितले होते.
ही मागणी शिवसेनेची असल्याचा दावा
भाजपने मेट्रोचे श्रेय घेताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी, ही तर आपलीच जुनी मागणी असल्याची माहिती दिली. 7 फेब्रुवारी 2018 मध्ये नियम 377 काळात लोकसभेत आपण मेट्रोबाबत मत मांडत मागणी केली होती. औरंगाबाद औद्योगिक - ऐतिहासिक असे शहर आहे. उद्योगधंदा तसेच पर्यटनासाठी देश-विदेशातून लोक शहरात येतात. त्यावेळी दळणवळण चांगले असावे याकरिता मेट्रो ची मागणी केली होती आणि आता जर कोणी त्याचे श्रेय घेत असेल तर हे चुकीचे आहे असे मत चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केले आहे.
डॉ कराड यांनी केली टीका
दरम्यान खैरेयांच्या या दाव्या नंतर डाॅ कराड यांनी म्हणले आहे की, लोकसभेत मत मांडले म्हणजे कोणताही प्रस्ताव मंजूर होत नसतो, त्यासाठी प्रयत्नही करावे लागतात. लोकसभेत खैरे यांनी त्यांचे मत मांडले असेल मात्र प्रत्यक्षात बैठकांमध्ये मी मेट्रो विषयी प्रश्न मांडत, अर्थ खात्यातून या कामांना मंजुरी मिळवून आणली. त्यामुळे खैरे यांना काही प्रश्न पडले असतील तर त्याला आपण काही करू शकत नाही असे मत डॉक्टर कराड यांनी व्यक्त केले आहे.