औरंगाबाद - गुटख्याच्या गुन्ह्यात सहआरोपी न करण्यासाठी ५० हजाराची लाच स्वीकारणाऱ्या सिटीचौक पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकाला लाचलुचपत म्हणजेच एसीबीने रंगेहाथ पकडले. संतोष रामदास पाटे असे लाचखोर उपनिरीक्षकाचे नाव आहे.
एका ५८ वर्षीय व्यापाऱ्याला गुटखा प्रकरणात सहआरोपी न करण्यासाठी सिटी चौक पोलीस ठाण्याचा उपनिरिक्षक संतोष पाटे याने ५० हजारांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र, व्यापाऱ्याने यासंदर्भात एसीबीकडे तक्रार दिली. एसीबीने तक्रारीची शहनिशा केल्यानंतर लाचेची रक्कम स्वीकारताना उपनिरिक्षक पाटे याला रंगेहाथ पकडले. ही कारवाई निरिक्षक संदीप राजपूत यांच्यासह पथकातील गणेश पंडुरे, गोपाल बरंडवाल, किशोर म्हस्के, केवल घुसिंगे यांनी केली.
उपनिरीक्षक पाटे बऱ्याच प्रकरणात नागरिकांकडून पैसे उकळत असल्याच्या तक्रारी पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्याकडे आल्या होत्या. अनेकदा याबाबत संतोष पाटे यांना समज देण्यात आल्याची माहिती आहे. याशिवाय त्याचे वडील सेवानिवृत्त सहायक फौजदार असल्याने त्यांच्या मार्फत देखील त्याला समज दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यात लाचलुचपत विभागाकडे तक्रार गेली आणि पाटे यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले गेले.