औरंगाबाद - भारत बटालियन येथील कोरोनाग्रस्त झालेले पोलीस कर्मचारी आपल्या कर्तव्यावर रुजू होण्यास सज्ज झाले आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांचे पोलीस बॅन्ड लावून स्वागत करण्यात आले. पोलीस आयुक्तांनी स्वतः उपस्थितांवर फुलांची उधळण केली.
औरंगाबादच्या भारत बटालियनमधील 74 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. या सर्व कर्मचाऱ्यांवर मागील वीस दिवसांपासून उपचार सुरू होते. 26 मे रोजी उपचार घेणारे सर्व पोलीस कोरोनामुक्त झाल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या या योद्ध्यांना आता डिस्चार्ज देण्यात आलाय.
भारत बटालियनचे जवळपास 84 पोलीस मालेगावला बंदोबस्तासाठी गेले होते. त्यावेळी औरंगाबादहून एक कर्मचारी साहित्य घेऊन मालेगावला गेला. तो परत आल्यावर संबंधित कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्याच्यावर उपचार करण्यात येत असताना बंदोबस्तासाठी गेलेले अधिकारी आणि कर्मचारी परत आले. त्यावेळी 74 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
आज त्यांच्या क्वारंटाइन कालावधी संपल्याने सर्व अधिकारी कर्मचारी कामावर रुजू होण्यास सज्ज झाले आहेत. सातारा येथील भारत बटालियन कॅम्पमध्ये सर्व कर्मचाऱ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या उपस्थितीत पोलीस बॅन्ड वाजवून सर्वांचे स्वागत करण्यात आले. उपस्थित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोरोना योद्ध्यांवर फुलांची उधळण करून स्वागत करण्यात आले.