औरंगाबाद: पीएफआय (PFI) अर्थातच पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया, औरंगाबाद येथे युवकांना धर्मांधाचे धडे देवून त्यांचे ब्रेन वॉश करत असल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे. पीएफआय विरोधात राज्यभर सुरू असलेल्या कारवाई नंतर अनेक कार्यकर्त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. (PFI raid in Aurangabad)
नारेगाव आणि पडेगावात प्रशिक्षण केंद्र: औरंगाबाद जिल्ह्यात पोलिसांनी पीएफआयच्या पाच ते सहा जणांना ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेण्यात आलेले माजी जिल्हाध्यक्ष शेख इरफान, सय्यद फैजल, परवेज खान, अब्दुल हबीब, नासिर शेख यांची कसून चौकशी केली जात आहे. यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सय्यद फैजल हा केरळ येथून प्रशिक्षण घेऊन आला होता. तो नारेगाव आणि पडेगाव या ठिकाणी जागा भाड्याने घेऊन काही मुलांना प्रशिक्षण देत होता. तसेच त्याने आतापर्यंत बीड, परळी, जालन्यात काही लोकांना प्रशिक्षण दिले असून काही बँकांमधून त्याने लाखोंचे व्यवहार केल्याचं देखील समोर आलं आहे. तर परवेज खान हा फैजलचा असिस्टंट म्हणून काम करत होता. परवेज कडून लॅपटॉप सह काही गोष्टी ताब्यात घेतल्याचं सूत्रांनी सांगितला आहे.
पकडलेल्या युवकांकडे होती जबाबदारी: राज्य कमिटीचा सदस्य शेख इरफान इस्लामिक राष्ट्राच्या कटात अग्रणी असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. अनेक बँकात त्याने लाखोंचे व्यवहार केले असून, मदरशां मधील तरुणांना जिहादचे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी त्याच्यावर असल्याचा संशय आहे. नाशिक, नांदेड, औरंगाबाद आणि मुंबई मध्ये त्याच्यावर चार गुन्हे दाखल आहेत. तर ताब्यात असलेल्या अब्दुल हबीब वर विद्रोह विचार पसरण्याची जबाबदारी असल्याचे कळते आहे. त्याच्या घरात आक्षेपार्ह कागदांचे अनेक पुरावे सापडले आहेत. त्याच्या इशाऱ्यावरच मराठवाड्यात अनेक जण कार्यरत असून तो महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं सांगण्यात आलं आहे.