औरंगाबाद - ऑक्सिजनची गरज असलेल्या एका रुग्णाला रिकामा सिलिंडर जोडल्याचा धक्कादायक प्रकार घाटी रुग्णालयात समोर आला आहे. तेथील कर्मचाऱ्याने तीन सिलिंडर बदलले मात्र तिन्ही वेळी त्याने रिकामेच सिलिंडर जोडण्याचा प्रताप केला आहे. भरलेले सिलिंडर त्याला सापडलेच नाही. त्यामुळे त्या रुग्णाचा तडफडून मृत्यू झाला, असा आरोप रुग्णाच्या नातेवाइकांनी केला आहे.
सुनील रमेश मगरे असे मृताचे नाव आहे. ते बापूनगर - खोकडपुरा येथील रहिवासी आहेत. विशेष म्हणजे, सुनील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते होते. रुग्णालयात घडलेला हा प्रताप सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे.
सुनील मगरे यांचे पोट दुखत असल्यामुळे त्यांच्यावर बायजीपुरा येथील अपोलो ‘हॉस्पिटल’मध्ये दोन दिवसांपाासून उपचार सुरू होते. पण अपोलोमध्ये सुनीलला निमोनिया झाल्याचे कळले. त्यानंतर त्याला मंगळवारी रात्री आठ वाजता घाटी रुग्णालयात जाण्यास सांगितले. तिथे दाखल झाल्यानंतर ‘कॅज्युअल्टी’ विभागामध्ये सुनीलची तपासणी सुरू होती.
सुनीलला तिथूनच ओपीडीमध्ये दाखल करण्यासाठी रूग्णवाहिकेत बसवण्यात येणार होते. तत्पूर्वी सुनीलला तातडीने ऑक्सिजनची गरज भासली. पण कर्मचाऱ्यांनी रिकामे सिलिंडर लावून दिले. रिकाम्या सिलिंडरमुळे सुनीलला श्वास घेण्यास त्रास झाला. मग, आरोग्य कर्मचाऱ्यांनी बदलून दुसरे सिलिंडर लावले, तर ते गळके निघाले. मग, मात्र रुग्णांच्या नातेवाईकांनीच पळत जाऊन तिसरे सिलिंडर आणले. पण तोपर्यंत सुनीलचा तडफडून मृत्यू झाला होता.
एका महिला कर्मचाऱ्याने त्याच्या मृत्यूनंतर पंपिंग सुरू केले होते. पण डॉक्टर कॅज्युअल्टीतून रूग्णवाहिकेपर्यंत आले नाहीत, असा नातेवाईकांचा आरोप आहे. थोड्यावेळाने सुनीलला मृत घोषित करण्यात आले.
सीसीटीव्हीत कैद झाली घटना-
रात्री साडेनऊच्या सुमारास सुनील मगरे यांना घाटीच्या दुसऱ्या विभागात हलवण्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेत हलवण्यात आले होते. मात्र, रुग्णवाहिकेजवळ गेल्यावर सुनील उठून बसले होते. तसेच ऑक्सिजन सिलिंडर घेऊन जाताना दोनदा घाटी कर्मचारी सीसीटीव्ही मध्ये दिसून आले. रुग्णाचे स्वास्थ बिघडल्याने डॉक्टरांनी पंपिंग केलं. मात्र प्रकृती खालावल्याने रुग्णालयाच्या गेटमधेच रुग्णाने जीव सोडल्याच सीसीटीव्हीत स्पष्ट दिसून येत आहे.