औरंगाबाद - निवडणुकीला सामोरे जाताना भीती वाटते, पण कामाच्या ओघात भीती जाणवत नाही, असे मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी शहरात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. तसेच परळी मतदारसंघात आपल्या बहिणीची 'हवा' असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.
या विधानसभा निवडणुकीत आम्ही जिंकून येऊ; परंतु, एकहाती विजय मिळेल असे सांगणे चुकीचे राहिल,असे पंकजा मुंडे म्हणाल्या. मुंडे कुटुंबीयांच्या पारंपरिक परळी या मतदारसंघाबद्दल बोलताना, आम्ही एकमेकांत वाटून घ्यायला परळी आमची जहागिरी नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच मी कधीच मुख्यमंत्री होण्याचा दावा केलेला नसून, देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार हे देखील त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
प्रचारादरम्यान सावरागावधील मेळव्यात मुंडे यांना काळे झेंडे दाखवण्यात आले होते. यासंबंधी बोलताना, संबंधित मेळाव्यात ज्यांनी फलक दाखवले, त्यांना मी ओळखत देखील नसून, ती लोकांची भावना आहे, असे त्यांनी सांगितले.
सरकारने गेल्या पाच वर्षात अनेक विकासाची कामे करण्याचा प्रयत्न केला. बेघरांना घर देण्यासाठी विविध योजना केल्याचे त्यांनी म्हटले. तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याने अनेक शेतकऱ्यांना फायदा झाल्याचा दावा पंकजा मुंडे यांनी केला. मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यास सरकारला यश आल्याचे त्यांनी सांगितले.
धनगर समजला आदिवासी समाजाच्या सवलती देण्याचा प्रयत्न केला असून, आता हा मुद्दा केंद्रात प्रलंबित असल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी दिली.