औरंगाबाद - राखी पौर्णिमेचा सण काही दिवसांवर आला आहे. मात्र, यंदा सर्वच सणांवर कोरोनाचे सावट असल्याने उत्साहात सण साजरे करण्यावर विरजण पडले आहे. रक्षाबंधनासाठी एकमेकांपासून दूर राहणाऱ्या भावा-बहिणींची प्रत्यक्ष भेटण्याची शक्यता यंदा मावळली आहे. याचा थेट फटका राखी विक्रेत्यांना बसला आहे.
राखी विक्रेत्यांना यंदा अनेक कारणांमुळे दुकानं लावता आली नाहीत. तसेच अनेक किरकोळ व्यावसायिकांनी दुकानं लावलीच नाहत. याचसोबत अनेकांनी आर्थिक परिस्थितीमुळे या व्यवसायाकडे पाठ फिरवल्याने राखी विक्रीचा खप कमी झाला आहे. कोरोनाच्या संकटामुळे विक्रेत्यांवर विविध प्रकारच्या नियमाचा भडीमार झाला आहे. तसेच चीनी माल विक्रीसाठी नसल्यामुळे व्यवसायाच्या नफ्यात देखील फरक आल्याचे व्यापाऱ्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
श्रावण महिन्यात अनेक सणांमुळे व्यापाऱ्यांमध्ये एक वेगळाच उत्साह असतो. दिवाळी आधी श्रावण महिन्यात फार मोठ्याप्रमाणात बाजारपेठेत उलाढाल असते. विविध सण या महिन्यात असल्यामुळे व्यापारी वर्ग श्रावण महिन्याच्या आधीपासूनच विक्रीसाठी सज्ज असतो. भावा-बहिणीचा सण म्हणून राखी पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्व आहे. बहिणी आपल्या भावांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या हौशीने खरेदी करतात. त्यामुळे बाजारपेठेत राखीच्या व्यवसायाची उलाढाल देखील मोठ्या प्रमाणात असते. मागील वर्षी शहरात तब्बल राखीच्या व्यवसायात तीन ते साडे तीन कोटींची उलाढाल झाली होती. मात्र यंदा 60 ते 70 टक्क्याने घट होऊन व्यापाऱ्यांनी सुमारे 70 ते 80 लाखांचीच खरेदी केल्याचे होलसेल व्यापारी प्रवीण बोरा यांनी सांगितले. चीनच्या मालाला सध्या मोठ्या प्रमाणात नकार आहे. मागील वर्षी शहरात तीन हजारांच्यावर राख्यांचे विविध प्रकार विक्रीस होते. यंदा मात्र बाराशे ते पंधराशे प्रकारच्याच राख्या बाजारात दिसणार आहे. त्याची किंमत देखील सहा रुपयांपासून सहाशे रुपयांपर्यंत आहे.
शहरात सात ते आठ मुख्य होलसेल व्यावसायिक आहेत. तसेच त्यांच्याकडून माल खरेदीकरून शहरात तसेच ग्रामीण भागात 400 ते 500 व्यापारी किरकोळ व्यवसाय करतात. त्यामुळे शहरप्रमाणे ग्रामीण भागातही राखी विक्री मोठ्या प्रमाणात होते.मात्र, अनेक जिल्ह्यांच्या सीमा बंद असल्यामुळे तेथील व्यापारी माल घ्यायला येऊ शकत नाही. ग्रामीण भागाचा वाढता प्रादुर्भावामुळे आठवडी बाजार बंद आहे. तसेच ग्रामीण भागात घरातून विक्री करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांनी देखील राख्या घेण्यासाठी पाठ फिरवल्याने व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. एक आठवडी बाजारात किमान 100 ते 150 छोटे विक्रेते राख्यांची दुकाने लावतात, पण यंदा त्यांनी अजूनही माल नेलेला नाही. तसेच बाहेर गावावरतून अथवा बाहेर गावी राखी पाठवण्याचे देखील यंदा प्रमाण कमी झाले आहे.
कोरोनामुळे अनेक व्यवसाय, उद्योगांचे ऑनलाइन व्यवहार सुरू आहेत. परंतु ऑनलाइन राखी होलसेलमध्ये विकणे कठीण आहे. किरकोळ व्यापारी ऑनलाइन राख्या पाहून सर्वप्रथम संतुष्ट होत नाही. होलसेल बाजारात राख्या मोठ्या प्रमाणात परत देखील घेतल्या जातात. त्यापासून संसर्गाचा होण्याची शक्यता आहे, असे बोरा यांनी सांगितले.