औरंगाबाद - महानगर पालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील 13 वर्षीय नाझिया नावाच्या मादी बिबट्याचा आजारपणामुळे मृत्यू झाला. वृद्धापकाळामळे नाझिया गेल्या काही दिवसांपासून आजारी होती. दरम्यान, शुक्रवारी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
31 मार्च 2009 मध्ये नाझिया नावाच्या मादी बिबट्याला मुंबई येथील बोरिवलीच्या संजय गांधी आंतरराष्ट्रीय उद्यानातून औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानात आणण्यात आले. त्यावेळी तिचे वय तीन वर्ष होते. नाझिया हे नाव तिला मुंबईच्या प्राणिसंग्रहालयात देण्यात आले. दरम्यान, दहा वर्षे नाझिया औरंगाबादच्या सिद्धार्थ प्राणी संग्रहालयात वास्तव्यास होती. मागील सहा दिवसांपासून ती आजारी होती. वृद्धापकाळाने तिला यकृताचा आजार झाला होता. वैद्यकीय उपचार सुरू असताना उपचारांना प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती उद्यान पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
हेही वाचा - बाप्पांसमोर अप्पर पोलीस अधीक्षकांचा फुगडीचा फेरा; तर उपअधीक्षकांचा पंजाबी तडका
औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानात तीन बिबट्या आहेत. त्यापैकी राजा हा एक नर आणि नाझिया आणि रेणू या दोन मादी होत्या. नाझीयाच्या मृत्यूने राजा आणि रेणूची जोडी उद्यानात राहिली आहे.