औरंगाबाद - जिल्ह्यात कोरोनाचा वाढता उद्रेक लक्षात घेता आरोग्य विभागाने पूर्ण लॉकडाऊन लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. तरी रोजगाराचे होणारे नुकसान पाहता लॉकडाऊनचा निर्णय घेण्याबाबत अद्याप विचार सुरू असल्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत सागितले. दरम्यान, मराठवाड्यातील बीड, नांदेड, परभणी या जिल्ह्यांमध्य़े लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.
हेही वाचा - सचिन वाझेच्या एनआयए कोठडीत 3 एप्रिलपर्यंत वाढ करण्याचे कोर्टाचे निर्देश
आरोग्य यंत्रणा सज्ज करण्याच्या सूचना
कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, त्या अनुषंगाने आरोग्य यंत्रणा सज्ज करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती पालकमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. बेड वाढवणे, ऑक्सिजन पुरवठा करणे याची व्यवस्था केली जात आहे. हे सगळे करण्यासाठी राज्य सरकारकडून कोणतेही पाठबळ कमी पडू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. रुग्णांचे हाल होऊ दिले जाणार नाहीत. लसीकरण वाढवण्यासाठी लसीकरण केंद्र वाढवणेबाबत सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर चाचणी वाढविण्यावर भर देण्यात आले असून लवकरच निदान होऊन उपचार करणे सोयीचे होईल. 85 टक्के रुग्णांना कुठलीही लक्षणं नसल्याने ही एक दिलासादायक गोष्ट असल्याचे मत पालकमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केलं.
लॉकडाऊनचा निर्णय लवकरच
राज्याच्या आरोग्य विभागाने काही शहरांमध्ये लॉकडाऊन लावण्याचा सूचना दिल्या आहेत. परंतु लोकांचा विचार करता लॉकडाऊन न करता आठवडाअखेर दोन दिवस पूर्ण लॉकडाउन, नाईट कर्फ्यु यांच्यावर भर देण्याचा विचार करण्यात येत आहे. मात्र, राज्याच्या आरोग्य विभागाचे मत घेऊनच औरंगाबादबाबत योग्य निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये त्यासाठी काही कडक पावले आम्ही उचलणार आहोत. त्यामुळे लवकरच लॉकडाऊन बाबतदेखील निर्णय घेण्यात येईल. गंभीर परिस्थिती येण्यापूर्वीच निर्णय घेणे गरजेचे आहे. अशा आरोग्य विभागाच्या सूचना आहेत. लोकांचे आरोग्य रक्षण महत्त्वाचा असल्याने येणाऱ्या काळात राजकीय कार्यक्रम, जाहीर सभा घेऊ नये तसेच आव्हान करण्यात येत असून, याबाबत लवकरच निर्णय जाहीर केला जाईल असं सुभाष देसाई यांनी सांगितलं. जिल्हाधिकारी कार्यालयात सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महापालिका आयुक्त कुमार पांडेय, पोलीस आयुक्त निखील गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मंगेश गोंदावले आणि पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील या उपस्थित होत्या.
हेही वाचा - दीदींच्या प्रचारासाठी शरद पवार पश्चिम बंगालच्या ३ दिवसीय दौऱ्यावर