औरंगाबाद - मराठा क्रांती मोर्चाने विविध मागण्यांसाठी राज्यात शांततेत मोर्चे काढले. त्यानंतर ठोकमोर्चा काढण्यात आला. इतकी आंदोलने करूनही मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य झाल्या नाहीत. अनेकवेळा निवेदन देऊनही फायदा होत नसल्याने मराठा क्रांती मोर्चाने आता बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
मराठा समाजाने केलेल्या विविध आंदोलनात अनेक आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात आली होती. सरकारने गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन देऊनही ते मागे घेतले नाहीत. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान 42 युवकांनी बलिदान दिले. अशा प्रत्येकाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देऊन कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देण्याचे आश्वासनही सरकारने दिले होते. मात्र हेही आश्वासन सरकारने पूर्ण केले नाही.
त्याचप्रमाणे अॅट्रासिटी कायद्यात सुधारणा करण्याच्या मागणीसह अनेक मागण्या अद्यापही प्रलंबित आहेत. त्यावर सरकार कुठलीही भूमिका घ्यायला तयार नाही. त्यामुळे मराठा क्रांतीमोर्चा तर्फे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नसल्याची भूमिका मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी घेतली आहे.