औरंगाबाद : सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले ( Maharashtra Political crisess )असून, राज्यातील सरकारचे अस्तित्व धोक्यात आले आहे. राज्यात सत्तांतर होणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यात आता औरंगाबादच्या एका पठ्ठ्याने मला महाराष्ट्राचा प्रभारी मुख्यमंत्री करा, अशी मागणी करणारा मेलच राष्ट्रपतींकडे केला आहे. भारत आसाराम फुलारे ( Bharat Asaram Phulare ) असे तरुणाचे नाव असून, ते पत्नी पीडित पुरुष संघटनेचे अध्यक्ष आहेत.
राजकीय उलथापालथमुळे महाराष्ट्र जनता पोरकी : महाराष्ट्रात सध्या स्थिर सरकार नसल्याने महाराष्ट्राच्या जनतेचे प्रचंड नुकसान होत आहे. महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधीदेखील स्वतःचे राज्य सोडून जनतेची काळजी न करता खुर्ची व पदासाठी परराज्यात जाऊन बसले. तसेच, राज्याचे राज्यपाल यांनादेखील दुर्दैवाने कोरोना झाल्यामुळे त्यांचा पदभार परराज्यातील राज्यपालांना सोपवावा लागला. यामुळे महाराष्ट्राची जनता अगदी पोरकी झाली आहे.
मेलद्वारे मुख्यमंत्री पदाची मागणी : महाराष्ट्रातील अशा अघोरी राजकारणामुळे जनतेचे प्रश्न प्रलंबित राहू लागले व जनता अगदी हतबल झाली आहे. म्हणून जोपर्यंत महाराष्ट्रातील राजकारण स्थिर होऊन मुख्यमंत्रिपद स्थिर होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा प्रभारी पदभार जनतेच्या हिताचा विचार करून माझ्याकडे सोपवावा, अशा प्रकारचे पत्र भारत फुलारे यांनी ई-मेलद्वारे देशाच्या राष्ट्रपती व राज्याचे राज्यपाल यांना पाठवले आहे. भारत फुलारे यांनी केलेली मागणी सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनत आहे.