औरंगाबाद - मोदी सरकारच्या एक वर्षाच्या कार्यकाळातील निर्णयांबद्दल भाजपतर्फे ऑनलाईन व्हर्च्युअल सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ऑनलाईन पद्धतीने सभासद नोंदणी करणार असल्याची माहिती खासदार डॉ.भागवत कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली. संबंधित ऑनलाईन सभेत नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाचे पहिले वर्ष पूर्ण होत आहे. या कार्यकाळात मोदी सरकारने अनेक लोकहिताचे निर्णय घेतल्याचा दावा यावेळी करण्यात आला. 70 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांना देखील भारतीय जनता पार्टीने कायद्याच्या, संविधानाच्या आधारे सोडवले. यात स्वच्छ भारत अभियान, जनधन खाते, गरिबांना उज्ज्वला योजनेतुन मोफत गॅस, शेत माल व पिकाला आधारभूत किंमत जाहीर करणे, त्याच बरोबर ग्रामीण विकासाच्या दृष्टीने आणि शेतीच्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या व ग्रामीण जीवनावर प्रभाव टाकणारे अनेक प्रभावी निर्णय भारतीय जनता पार्टी सरकारने केंद्र सरकारने घेतल्याचे खासदार भागवत कराड यांनी सांगितले.
यामध्ये पिक विमा,शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड, तसेच युरिया नीम कॉटेड म्हणून उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांच्या मालाला आधारभूत किंमत जाहीर करून माल खरेदी करणे तसेच पंतप्रधान आवास योजना अंतर्गत शहरी भागात व ग्रामीण भागात घरे निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने अनेक प्रयत्न केले, असे कराड म्हणाले.
मराठवाडा व विदर्भ या विभागातील व्हर्च्युअल रॅलीला केंद्रीय कृषिमंत्री व ग्राम विकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर दिल्लीतून संबोधित करणार आहेत. या रॅलिचे प्रस्ताविक विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करणार आहेत. केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे, आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केनेकर हे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या हॉलमध्ये उपस्थित राहून रॅलीत सहभाग नोंदवणार आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सभा-सम्मेलन घेता येत नसल्याने भारतीय जनता पार्टीने या रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी 50 लाख जनतेपर्यंत पोहोचणार असल्याचे त्यांनी सांगितले.
घरी बसून प्रत्येक व्यक्ती मोबाइलवर सोशल मीडियाच्या माध्यमातून या रॅलीत सहभागी होऊ शकतो. तसेच राज्यभरातील नागरिकांना देखील रॅलीत सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.