औरंगाबाद - जिल्ह्यात सातत्याने वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या पाहून प्रशासनाने आता काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात हॉट स्पॉट ठरलेल्या वाळूज परिसरात दिनांक 4 ते 12 जुलै या काळात संचारबंदी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इतकेच नाही तर जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर लवकरच अधिक कडक निर्णय घ्यावे लागतील, असा इशारा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाबधितांची संख्या आता 5 हजारांवर गेली आहे. या परिस्थितीला नियंत्रित करण्याबाबत योग्य उपाययोजना करण्यासाठी लोकप्रतिनिधींची महत्वाची बैठक जिल्हाधिकाऱ्यांनी आज (सोमवार) घेतली. तसेच उपाययोजनांबाबत लोकप्रतिनिधींची मते जाणून घेतली. त्यानुसार शहरात देखील संचारबंदी लावण्याबाबत विचारणा सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हेही वाचा... मिशन बिगीन अगेन २.० : राज्यात ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन
औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या पाहता, मागील काही दिवसांपासून लोकप्रतिनिधींनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना लक्ष केले आहे. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तसेच दररोज मोठ्या संख्येने कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आज ही महत्वाची बैठक घेतली होती. तीन तासांच्या बैठकीनंतर त्यांनी बोलताना, येत्या 10 जुलैपर्यंत लोकांमध्ये जनजागृती करावी असे प्रशासनाने ठरवले आहे. जनजागृती केल्यानंतर देखील नागरिकांमध्ये बदल दिसून आला नाही, तर कदाचीत औरंगाबाद शहरात पूर्णतः लॉकडाऊन करावा लागेल, असा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.
हेही वाचा... तीन हजारांची मागणी असताना केंद्राने केवळ २७७ व्हेंटिलेटर्स दिले; पाहा आरोग्यमंत्री राजेश टोपेंची मुलाखत
औरंगाबादेतील वाळूज औद्योगिक वसाहतीत मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे येथील 7 ग्रामपंचायतींना विश्वासात घेऊन 4 जुलै ते 12 जुलै असा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे औरंगाबाद शहरातून कोणीही त्या भागात अथवा तिकडून शहरात येऊ-जाऊ शकणार नाही. कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना पास दिले जाईल. ज्यांच्याकडे पास आहेत. फक्त तेच बाहेर ये-जा करू शकणार आहेत. दरम्यान, कंपनीने सुद्धा अंतर्गत काम काही प्रमाणात कमी करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. या बंदच्या काळात वाळूज भागात दूध आणि औषधे शिवाय सगळे बंद राहणार आहे.