औरंगाबाद - एक मे रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिवस आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या कामगार दिवसावर यंदा लॉकडाऊनचे सावट आहे. संचारबंदीच्या काळात हातावर पोट असलेल्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसलाय. यामध्ये कामगार आणि मजूरवर्ग सर्वाधिक भरडला गेला आहे. संचारबंदीच्या काळात कामगारांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळलंय. यामुळे त्यांची उपासमार सुरू झालीय. शहरात जेवणाची सोय होत नसल्याने त्यांनी गावचा रस्ता धरला आहे.
औरंगाबाद औद्योगिक वसाहत राज्यातील अग्रणी उद्योगनगरी मानली जाते. जवळपास तीन ते चार लाख कामगार या ठिकाणी काम करतात. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे कारखान्यातील धडधड थांबली; आणि अनेकांच्या हातचा रोजगार गेला. कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे यंदाचा कामगार दिवस कामगारांसाठी निराशादायी असणार आहे.
ऐंशीच्या दशकातील उद्योग नगरी
मराठवाड्याला औद्योगिक महत्व देणारी औरंगाबाद उद्योग नगरी 80 च्या दशकात नावारुपास आली. बजाज कंपनीने पहिल्यांदा प्लांट उभारला; आणि या उद्योग नगरीची वाटचाल सुरू झाली. यानंतर अनेक देशी-विदेशी कंपन्या सुरू झाल्या आणि बघता बघता देशाच्या अग्रगण्य उद्योग वसाहतीत औरंगाबादची गणती होऊ लागली. ऐतिहासिक शहर ते औद्योगिक नगरी अशी वेगळी ओळख शहराची तयार झाली. मराठवाड्यातील खेड्या पाड्यातून तसेच शहरांमधून अनेकांना रोजगार उपलब्ध झाला.
चार हजार उद्योगधंदे आणि लाखांच्या घरात कामगार
औरंगाबादेत सध्या स्थितीत जवळपास चार हजार लहानमोठे उद्योग आहेत. या माध्यमातून तीन ते चार लाख कामगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे. मात्र, गेल्या महिना भरापासून कारखाने बंद पडल्याने अनेकांच्या रोजगाराला खीळ बसली आहे. विशेषतः रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांचे हाल होत आहेत. दोन लाखांच्या जवळपास मजूर कंत्राटी पद्धतीने काम करत असल्याने हजेरीवर निघणारे वेतन थांबले आहे. काही आर्थिक क्षमता असलेल्या कंपन्यांनी आपल्या कामगारांना काम न करता वेतन दिले आहे. मात्र, अनेक छोट्या उद्योजकांना उत्पादन बंद असल्याने आर्थिक संकटात सापडले आहे. त्यामुळे कंपनीचे भाडे अन्य खर्च काढणे शक्य होत नसल्याने अशा कंपन्यांना कामगारांच्या वेतनात कपात करावी लागलीय. अनेकांच्या घरी चूल पटवणे अवघड झाल्याने त्यांच्यासमोर जगण्याचा प्रश्न उभा राहिलाय. त्यामुळे आता सरकारने कामगारांना भत्ता देऊन मदत करावी, अशी मागणी कामगार नेते अॅड.अभय टाकसाळ यांनी केली आहे.