औरंगाबाद - महानगरपालिकेच्या वतीने बुधवारी 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुला मुलींसाठी लसीकरण मोहिम सुरु करण्यात आली. मात्र या मोहिमेच्या पहिल्या दिवशी अवघ्या वीस विद्यार्थ्यांनीच लस घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लहान मुलांच्या लसीकरणाकडे नागरिकांनी पाठ फिरवली की काय असा प्रश्न निर्माण झाला.
ऐन परीक्षेच्या काळात लसीकरण मोहीम
महानगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेला प्रतिसाद कमी दिसून आला. मात्र मार्च महिन्यात बहुतांश शाळांच्या परीक्षा सुरू असतात. लस घेतल्यावर आपलं मुल आजारी पडेल किंवा त्याला काही साईड इफेक्ट झाला तर त्याला परीक्षेला मुकावे लागेल, या भीतीने अनेक पालकांनी आपल्या मुला-मुलींना लस दिली नसल्याचं कारण समोर आलं आहे. तर अनेक ठिकाणी ही लस किती गुणकारी आहे. लहान मुलांना ती अपाय करणार नाही ना? अशी भीती वाटत असल्याने अनेकांनी पहिल्या दिवशी लसीकरणाकडे पाठ फिरविल्याचे समोर आले आहे.
85 हजार विद्यार्थ्यांना लस देण्याचे उद्दीष्ठ
महापालिकेच्या वतीने शहरातील मुलांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. वय वर्ष 12 ते 14 या वयोगटातील मुलांची संख्या जवळपास 84 हजार 835 इतकी आहे. बुधवारी महानगरपालिकेच्या प्रियदर्शनी शाळेमध्ये लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. तिथे पहिल्या दिवशी 20 मुलांना लस देण्यात आली. गुरुवार पासून सर्वत्र मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिमेला सुरुवात होईल अशी माहिती मनपातर्फे देण्यात आली. चीनच्या 11 शहरांमध्ये कोरोनामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्याची वेळ आली आहे. चौथ्या लाटेची भीती आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मुले, नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी केले आहे.
हेही वाचा : १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला अल्प प्रतिसाद, १२४ मुलांचे लसीकरण