औरंगाबाद - शहर वाहतूक पोलिसांनी अनोखी मोहिम हाती घेतली आहे. नेहमी दंड आकारूनही अनेक वाहनचालक नियम पाळत नसल्याने वाहतूक पोलिसांनी आता गांधीगिरीचा मार्ग स्वीकारला आहे. नियम पाळणाऱ्यांना गुलाबाचे फूल तसेच न पाळणाऱ्यांना वाहतूक नियमावली पत्रक वाटपाचा उपक्रम पोलिसांनी भरवला आहे.
नोव्हेंबर महिन्याचा तिसरा रविवार अपघातग्रस्तांचा स्मृतिदिन म्हणून पळाला जातो. या दिवसाच्या अनुषंगाने शहर वाहतूक पोलिसांनी अभिनव उपक्रम राबवला. वाहतूक शाखेचे सहाय्यक आयुक्त डॉ. दिनेशकुमार कोल्हे, पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी, सहाय्यक निरीक्षक बहुरे आणि सहकाऱ्यांनी शहरातील विविध रहदारी असलेल्या भागात नियम पाळणाऱ्या वाहन चालकांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे अभिनंदन केले. तसेच नियम तोडणाऱ्यांना नियमावलीचे पत्रक देण्यात आले आहे. यामध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड आणि शिक्षेच्या तरतुदी याबद्दल माहिती देण्यात आली आहे.
मोहिम राबवताना पोलिसांनी वाहतूक नियमांवद्दल जनजागृती केली. नियम मोडल्याने अपघात होतात. अपघात टाळायचे असल्यास वाहन चालकानी नियमांचे पालन केले पाहिजे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
विना हेल्मेट, ट्रिपल सीट तसेच मद्य प्राशन करून गाडी चालवल्यास लागणारा दंड, होणारी शिक्षा याबाबत लोकांना सतर्क करण्याचे काम औरंगाबाद वाहतूक पोलिसांनी केले या उपक्रमामार्फत केले.