औरंगाबाद - ऑनलाईन जून साहित्य विकत असाल तर थोडं सावध व्हा, कारण जुन्या सामानाचे पैसे मिळवण्याच्या नादात तुमच्या खात्यातील रक्कम लंपास होऊ शकते. अशीच एक घटना औरंगाबादेत समोर आली आहे. ज्यात एका महिलेची जवळपास तीन लाखांची फसवणूक झाली आहे.
अशी दिली होती जाहिरात...
औरंगाबादच्या गारखेडा परिसरात राहणाऱ्या एका युवतीने ओऐलएक्स या जून साहित्य खरेदी - विक्री संकेत स्थळावर घरातील जुना टेबल विक्री करिता जाहिरात दिली होती. टेबल अडीच हजारात विकायचा आहे, असं त्यात नमूद करण्यात आले होते. जाहिरात देताच काही वेळात त्यांना एका महिलेने टेबल आवडला असून आपण तो दिलेल्या किमतीमध्ये विकत घेण्यास तयार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार थोड्यावेळाने महिलेच्या पतीने टेबल विकत घेण्यासाठी पुन्हा फोन करत अजून इतर काही वस्तू असतील तर सांगा अस सांगितले. त्यानुसार महिलेने घरातील एक स्टँड देखील विक्री कारायचा असून तो पाचशे रुपयात विक्री करायचा असल्याचे सांगितले. त्यानुसार स्टँड आणि टेबल 2750 रुपये देण्याचा सौदा ठरला.
अशी झाली फसवणूक....
औरंगाबादचा 23 वर्षीय महिलेने आपल्या घरातील टेबल आणि स्टँड विकण्याची जाहिरात टाकल्यानंतर मदन शर्मा नावाच्या माणसासोबत तिचा सौदा ठरला. त्यानंतर पैसे देण्यासाठी आपण खात्याची खात्री करून घेऊ म्हणून मदन शर्मा यांनी महिलेला एक क्यूआर कोड टाकला, त्यासोबत 10 रुपये महिलेला त्यांनी पाठवले. खात्याची खात्री करून घेण्यासाठी तिकडून काही पैसे टाकण्याची विनंती मदन शर्मा यांनी महिलेला केली. त्यानंतर माझं स्वॅप मशीन खराब आहे. तुम्ही मला पैसे टाका, म्हणजे खात्याची खात्री होईल, मी तुम्हाला सर्व लगेच परत देतो अस आश्वासन त्याने महिलेला दिल. मदन शर्मा यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत महिलेने टप्प्याटप्प्याने काही पैसे टाकले. त्यानंतर महिलेच्या खात्यातून दोन लाख 95 हजार रुपये मदन शर्मा याच्या खात्यात गेल्याच लक्षात आले. महिलेने मदन शर्मा आणि त्यांच्या पत्नीच्या फोनवर संपर्क केला असता दोन्ही क्रमांक बंद आले. त्यानुसार महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने पुंडलिक नगर पोलिसात आपली तक्रार नोंदवली आहे.
पोलिसांनी दिला सतर्क राहण्याचा ईशारा...
ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चाललेली आहे. आपण कुठलेही व्यवहार करत असताना आपल्या बँकेतील खात्याचा तपशील कोणालाही देता कामा नये. मात्र, अनेक वेळा ऑनलाइन व्यवहार करत असताना लोक आपल्या बँकेचे तपशील एकमेकांना देतात आणि त्यामधूनच फसवणुकीचे असे प्रकार होत असतात. ऑनलाइन पद्धतीने व्यवहार करत असताना योग्य ती खबरदारी घेतली गेली पाहिजे. आपल्या बँकेचा तपशील कोणालाही देऊ नका. आपल्या मोबाईल वर आलेले बँक खात्याचे तपशील गोपनीय असतात आणि त्यामुळे आलेले ओटीपी नंबर देखील कोणालाही देऊ नका. किंवा क्यूआरकोड मार्फत व्यवहार करत असताना सर्व खबरदारी घेऊनच पुढील व्यवहार केले पाहिजेत. अन्यथा फसवणूक होते. अशा पद्धतीच्या फसवणूक झाल्यास त्वरित पोलिसांना किंवा आर्थिक गुन्हे शाखेला व्यवहारबाबत माहिती दिल्यास आरोपींचा शोध घेऊन झालेली फसवणूक उजेडात आणली जाऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी ऑनलाइन व्यवहार करत असताना सतर्क राहावे असा इशारा पुंडलिक नगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिला.