औरंगाबाद - खासदार इम्तियाज जलील हे चंद्रकांत खैरे यांचे चेले आहेत. माझा पराभव करण्यासाठी खैरे यांनीच त्यांना निवडणुकीत उभं केलं होतं. मात्र खैरे यांचा पराभव झाला आणि हे इम्तियाज जलील यांना देखील मान्य करावे लागेल, असा टोला माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी लगावला.
महानगरपालिका निवडणुकीत जाधव आजमावणार नशीब
कन्नड ग्रामपंचायत निवडणुकीत पॅनल देत हर्षवर्धन जाधव यांनी राजकारणात कमबॅक केला आहे. औरंगाबाद शहरात शिवसेना आणि इतर पक्षांनी केलेले राजकारण पाहता नागरिकांना कुठल्याच सुविधा मिळाल्या नाहीत. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीत रायभान जाधव विकास पॅनल माध्यमातून निवडणूक लढवण्याचा विचार आहे. लोकसभा निवडणुकीत जसे आव्हान उभे केले तसे आव्हान महानगरपालिका निवडणुकीत उभं करण्याचा मानस असल्याचे हर्षवर्धन जाधव यांनी सांगितलं.
शहराचा नामांतर राज्य सरकारच्या हाती
औरंगाबाद शहराचा नामांतर करण्याचा बाद मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गेल्या काही वर्षांपासून याच मुद्द्यावर शहरात राजकारण केले जात आहे. सर्वच राजकीय पक्ष या मुद्द्यावरून आपली राजकीय पोळी भाजण्याचे काम करत आहेत. मात्र संभाजीनगर नामकरण करण्याचा मुद्दा आता महानगरपालिकेच्या नाही तर राज्य सरकारच्या हाती आहेत. त्यामुळे राज्य सरकारनेच भूमिका घेऊन हे नामांतर करायला हवं. मात्र तसं होत नाही, हे सर्व राजकारण लवकरच थांबायला हवं. धर्माच्या नावावर शहरांत राजकारण आता बंद करण्याची गरज असल्याचे मत हर्षवर्धन जाधव यांनी व्यक्त केलं.
कोरोना काळात डॉक्टरांनी केली लूट
मागील एक वर्षापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढत्या रुग्ण संख्येचा फायदा खाजगी रुग्णालय घेत आहेत. रुग्णांना जास्तीचे दर आकारून रुग्णालय लूट करत आहेत. या विरोधात आपण लवकरच आवाज उठवणार आहोत. या आधी देखील याबाबत तक्रार दिली असून शासनाने योग्य नियमावली तयार करून, खासगी रुग्णालयांवर रोक लावायला हवा. मात्र तसे होत नसल्याने या प्रकरणात स्वतःचा आवाज उठवणार असल्याचं मत हर्षवर्धन जाधव यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा - इंधनाच्या महागाईनंतर दुसरा झटका: गॅस सिलिंडर २५ रुपयांनी महाग
हेही वाचा - नागपूरात ३१ वर्षीय युवकाचा १६ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचार