औरंगाबाद - माजी महापौर नंदकुमार घोडेले यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांचा कोरोना अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसात त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
घोडेले यांना चार दिवसांपासून काही लक्षणे दिसून येत होते. त्यामुळे त्यांनी आपली कोरोना चाचणी करून घेतली. त्यानंतर त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे लक्षात आले. आतापर्यंत जवळपास दहा माजी नगरसेवकांना कोरोनाची लागण झाली आहे.
कोरोना महामारीमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुका पुढील काही महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांसह माजी नगरसेवकांनी मोठ्या प्रमाणात जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे. त्यात नागरीकांची अनेक कामे करण्यासाठी सरसावलेल्या आजी-माजी नगरसेवकांना कोरोनाची बाधा होत असल्याचे समोर आले आहे. इतकेच नाही तर त्यापैकी दोन माजी नगरसेवकांचा कोरोनामुळे मृत्यू देखील झाला आहे. नंदकुमार घोडेले यांचा महापौर पदाचा कार्यकाळ संपला असला तरी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी घोडेले अनेक ठिकाणी नागरिकांच्या संपर्कात होते. त्यांच्या अडचणी प्रशासकांसमोर मांडून त्या सोडविण्याचा प्रयत्न करत होते. त्यातच त्यांना बाधा झाली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा - देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ५6 लाखांवर, तर आतापर्यंत ९० हजारांवर बळी