औरंगाबाद- कोरोना रुग्णांच्या सेवेत असूनही प्रशासन कमी भत्ता देत असल्याचा आरोप औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातील आंतरवासीता डॉक्टरांनी केलाय. मिळणाऱ्या भत्त्यात वाढ व्हावी, या मागणीसाठी डॉक्टरांनी आज एक दिवसाचा संप पुकारला आहे. वाढीवभत्ता मिळण्यासाठी त्यांनी आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला आहे. जोपर्यंत जिल्हाधिकारी लेखी आश्वासन देणार नाहीत, तोपर्यंत कोवीड वार्डात ड्यूटी करणार नसल्याचं या डॉक्टरांनी म्हटले आहे.
जून महिन्यापासून आंतरवासीता डॉक्टर 20 दिवस कोविड वॉर्डमध्ये तर 10 दिवस बाकी वार्डामध्ये ड्युटी करतात. औरंगाबाद वगळता बाकी इतरत्र सर्व डॉक्टरांना वाढीव भत्ता मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आंतरवासीता डॉक्टरांनी घाटी प्रशासनाला वाढीव भत्ता मिळावा म्हणून मागणी केली आहे. ही मागणी घाटी प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडण्यात आली. मात्र फंड नसल्याचे सांगून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून फक्त तोंडी आश्वासन आल्यानं, आंतरवासीता डॉक्टर आक्रमक झालेत.