औरंगाबाद - वाढदिवसानिमित्त तलवारीने केक कापून वाढदिवसाचे छायाचित्र समाजमाध्यमावर टाकणाऱ्या दोघांना जवाहरनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या आरोपींकडून तलवारी जप्त करण्यात आल्या असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिंद्र रमेश अहिल्ये (वय - २०) आणि ओमकार विष्णू चव्हाण (वय -२३, दोघे रा. हनुमाननगर, गारखेडा) अशी आरोपींची नावे आहेत. महिंद्रचा १ एप्रिलला २० वा वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्रमंडळींनी आणलेला केक रस्त्यावर कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यानंतर, दुसरा आरोपी आरोपी चव्हाण हा महिंद्रला घरी घेऊन गेला. त्यांनी घरात तलवारीने केक कापला. यावेळी काढलेला व्हिडिओ गाणी समाज माध्यमांवर टाकली. फोटो व्हायरल झाल्यानंतर याची माहिती पोलिसांना मिळाली. जवाहर नगर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वाढदिवस साजरा करण्याचा नवा ट्रेण्ड
काही दिवसांपासून शहरांमध्ये तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करण्याचा नवा ट्रेण्ड दिसत आहे. धारदार शस्त्राने केक कापला जातो, यावेळी काढलेले फोटो दहशत पसरवण्याचा उद्देशाने समाज माध्यमावर टाकले जातात. धारदार शस्त्र वापरून केक कापल्याचे फोटो सोशल मीडियावर टाकणाऱ्या भाईंवर कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्यांतून केली जात आहे.