औरंगाबाद - अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी ब्राह्मण समाजाने आंदोलन केले. ब्राम्हण समाज अनेक वर्षांपासून 15 मागण्या करत आहे. मात्र, प्रत्येक वेळी फक्त आश्वासन मिळून मागण्या पूर्ण होत नसल्याने ब्राम्हण समाजातर्फे आंदोलनात करण्यात आले.
समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास यंदाच्या विधानसभा निवडणुकीत 'नोटा'ला मतदान करून ब्राम्हण निषेध नोंदवतील असा इशारा यावेळी सरकारला देण्यात आला. औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले.
पूर्वी 22 जानेवारी रोजी आझाद मैदानात आंदोलन करून ब्राम्हण समाजाने आपल्या मागण्या समाजासमोर मांडल्या होत्या. यामध्ये ब्राम्हण समाजाला 'केजी ते पीजी' मोफत शिक्षण देणे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करणे या प्रमुख मागण्या होत्या. तसेच या मागण्यांमध्ये, लंडनमधील सावरकरांचे निवासस्थान सरकारने विकत घेऊन त्याठिकाणी स्मारक करावे, ब्राम्हण समाजावर होणारी टीका टिप्पणी बंद करावी, भगवान परशुराम आर्थिक महामंडळ मंजूर करून पाचशे कोटींची तरतूद करावी, असे विविध विषय समाविष्ट आहेत.
सरकार नेहमी फक्त आश्वासन देते; त्याची पूर्तता करत नाही, त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये ब्राम्हण समाज नोटा पर्यायावर मत देऊन निषेध नोंदवेल, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.