औरंगाबाद - 'आजादी का अमृत महोत्सव' अंतर्गत औरंगाबाद शहरात एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला. एकाच वेळेस 16 हजार विद्यार्थ्यांनी सामूहिक राष्ट्रगीत म्हणत हा उपक्रम राबवला. यासाठी विशेष तयारी जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आली होती. कार्यक्रमाला खासदार इम्तियाज जलील, हरिभाऊ बागडे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि जिल्ह्यातील सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला होता.
16 हजार विद्यार्थी गायले राष्ट्रगीत - देशाचा 75 वा स्वतंत्रता दिवस साजरा केला जातोय. 9 ऑगस्ट हा क्रांती दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. याच दिवशी स्वातंत्र्याच्या मिळवण्यासाठी शेवटची लढाई सुरू करण्यात आली होती, आणि तिला यश मिळालं होतं. त्याचीच आठवण करून देण्यासाठी आजचा दिवस क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवसाचा औचित्य साधून औरंगाबादमध्ये विभागीय क्रीडा संकुल येथे 16 हजार विद्यार्थ्यांनी एकाच वेळेस राष्ट्रगीत गायलं. वेगवेगळ्या शाळांचे विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते. कार्यक्रमापूर्वी राष्ट्रभक्तीपर गीत सादर करून विद्यार्थ्यांनी वेगवेगळे उपक्रम सादर केले आहेत. सांस्कृतिक कलेचे दर्शन या निमित्ताने घडविण्यात आलं.
नव्या पिढीला एक वेगळी शिस्त लागू शकते - विद्यार्थ्यांनी केसरी, पांढऱ्या आणि हिरव्या टोप्या परिधान करत मैदानात एक मोठा तिरंगा तयार केला होता. त्यामुळे सोहळ्याला एक वेगळच महत्त्व प्राप्त झालं होतं. नेत्र दीपक असा हा सोहळा यावेळी घेण्यात आला. खासदार इम्तियाज जलील, आमदार हरिभाऊ बागडे आणि जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यावेळेस विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सैन्यात भरती होण्यासाठी केंद्राने अग्निपथ योजना सुरू केली आहे. त्याचा सर्व युवकांनी निश्चित जाव. ज्यामुळे देशाच्या नव्या पिढीला एक वेगळी शिस्त लागू शकते असे मत हरिभाऊ बागडे यांनी मांडलं आहे. तर पुढची 75 वर्ष या नव्या पिढीच्या हातात आहे. जगामध्ये भारताचे नाव पुढे न्यायची जबाबदारी आता या नव्या पिढीवर आहे. त्यामुळे एका नव्या जोशात आणि नव्या उमेदीने पुढे जा आणि जगात भारताचे नाव अग्रस्थानी घेऊन जावे, असे मत खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले आहे.
हर घर तिरंगा मधे 9 लाख ध्वज लावण्याचे उदिष्ठ - आजादी का अमृत महोत्सव साजरा करत असताना आपण ज्या स्वातंत्र्य सेनानींनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिल. देशाचा लढा लढला त्यांचा स्मरण केलं पाहिजे. नवी पिढी चांगलं शिक्षण घेत देशाचं भविष्य उज्वल करेल असं मत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी व्यक्त केलं. तर हर घर तिरंगा मोहीम अंतर्गत 9 लाख ध्वज लावण्याचा उद्दिष्ट असून गाव खेड्यापातळीपर्यंत ग्रामपंचायत आणि इतर माध्यमातून ध्वज उपलब्ध करून दिले आहेत. घरावर लावलेले ध्वज रात्री नाही काढले, तरी चालतील. मात्र, आस्थापना आणि शासकीय कार्यालयातील ध्वज रात्री काढावे अशा सूचना आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे.