औरंगाबाद - औरंगाबाद जिल्ह्यात गतीने लसीकरण पूर्ण केले जात असताना शनिवारी लसीचा तुटवडा निर्माण होईल अशी शक्यता निर्माण झाली होती त्यामुळे रविवारी लसीकरणाला ब्रेक देण्यात आला असला तरी सोमवारपासून 82 केंद्रांवर लसीकरण करण्याचे नियोजन महानगर पालिकेने केले आहे.
मागील काही दिवसांपासून दररोज 70 केंद्रांवर लसीकरण सुरू करण्यात आले होते महापालिकेकडे उपलब्ध असलेल्या 52000 लसी आतापर्यंत सर्वसामान्यांना देण्यात आल्या. वय वर्ष अठराच्या पुढील लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर रोज पंधरा ते वीस हजार दरम्यान नागरिकांना लस देण्यात येत होती. त्यात शनिवारी उपलब्ध असलेला लसींचा साठा कमी झाला होता. 2000 लस उपलब्ध असल्याने सोमवारपासून लसीकरण मोहीम ठप्प होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र रविवारी कोविशिल्डच्या 12000 लस महानगरपालिकेला प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार 79 केंद्रांवर लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. तर तीन केंद्रांवर कोवॅक्सीन लस नागरिकांना उपलब्ध असणार आहे. मात्र कोवॅक्सीनचा फक्त दुसरा डोस उपलब्ध असणार आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.
आता पर्यंत 4.24 लाख नगरिकांचे लसीकरण
औरंगाबाद शहरात मोठया प्रमाणात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. शहरातील अत्यावश्यक सेवा देणारे नागरिक, व्यापारी यांच्यासाठी विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली. शनिवार पर्यंत शहरात 4 लाख 24 हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती महानगर पालिकेच्या वतीने देण्यात आली.
कोरोना स्थिती नियंत्रणात.....
औरंगाबाद जिल्ह्यात 776 रुग्ण कोरोनाचे उपचार घेत आहेत. तर एक लक्ष 41 हजार 789 कोरोनामुक्त झाले आहेत. रविवारी एकूण 59 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली आहे. त्यात मनपा हद्दीत 14 तर ग्रामीण भागात 45 नवे रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत तीन हजार 417 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 776 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.