औरंगाबाद - कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता महानगरपालिकेने कडक पावले उचलायला सुरुवात केली आहे. विनामास्क फिरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांवर कारवाई करण्यासाठी पोलीसही तैनात असणार असल्याचे संकेत मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी दिले आहेत.
औरंगाबाद शहरात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी महानगरपालिकेच्यावतीने माजी सैनिकांचे विशेष पथक तयार करण्यात आले आहे. सद्यस्थितीत 32 पथके हे शहरात कारवाई करत आहेत. मात्र, शहरातील कोविड रुग्णांची वाढती संख्या पाहता मनपा आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांची एक बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीमध्ये नागरिकांमध्ये शिस्त लावण्यासाठी पावले उचलण्याबाबत चर्चा झाली. या चर्चेअंती लवकरच पोलीसदेखील विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करणार आहेत. याबाबतचे पत्र पोलीस आयुक्तांना देण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त अस्तिक कुमार पांडेय यांनी दिली.
हेही वाचा-स्पेक्ट्रम खरेदीत जिओची बाजी; केंद्र सरकारला मिळाले तब्बल ७७,८१५ कोटी रुपये!
सध्याचा कोरोना वेगळ्या पद्धतीचा असल्याचा अंदाज...
कोरोनाचे रुग्ण सध्या वाढत असल्याने महानगरपालिकेची चिंता वाढली आहे. मात्र, शहरात आढळून येणाऱ्या रुग्णांमध्ये वेगळ्याच प्रकारचा आजार दिसून येत असल्याचे संकेत मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनी दिले आहेत.आस्तिक कुमार पांडे म्हणाले की, एकाच कुटुंबामध्ये मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहेत, ही चिंतेची बाब आहे. मात्र दुसरीकडे रुग्ण जरी वाढत असले तरी मृत रुग्णांची संख्या मात्र कमी होत आहे. त्यामुळे हा आजार चिंतेची जरी बाब असली तरी परिस्थिती नियंत्रणात येऊ शकते. त्यासाठी नागरिकांनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्याबाबत महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन योग्य उपाययोजना करत आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यासाठीच वेगवेगळ्या पद्धतीच्या उपायोजना करत आहोत. म्हणूनच मास्क आजच्या परिस्थितीची विशेष गरज आहे.
हेही वाचा-सोन्याच्या दरात प्रति तोळा ६७९ रुपयांची घट ; चांदी १,८४७ रुपयांनी स्वस्त
मास्क न घालणाऱ्या लोकांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये पोलिसांचादेखील समावेश असावा. जेणेकरून विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांना वचक बसू शकतो. कोरोनाला हरविण्यात आपण मोठी जबाबदारी पार पाडू शकतो. त्यासाठी हे निर्णय घेतल्याची माहिती मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी दिली आहे.