औरंगाबाद - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासन औरंगाबाद शहरात संचारबंदी लावण्याची तयारीत आहे. तरिही त्या अगोदर काही दिवस जनजागृती करणार असल्याची भुमिका जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी मांडली होती. त्यानुसार आता पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाने जनजागृतीसह नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाईला सुरुवात केली आहे. गुरुवारी मनपा आयुक्त स्वतः यासाठी रस्त्यावर उतरले आणि काही नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली.
गुरुवारी औरंगाबाद महानगरपालिकेचे आयुक्त 'इन एक्शन' आल्याचे पहायला मिळाले. आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर समोर कारवाई केली. पांडेय यांनी शहरातील काही भागात स्वतः गस्त घालत विनामास्क फिरणाऱ्या लोकांवर दंडासह थेट गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली. स्वतः आयुक्तांनी कारवाई केल्याने प्रशासन आता कोरोना संसर्ग टाळण्यासाठी कठोर कारवाई करणार हे सिद्ध झाले.
हेही वाचा - नालासोपाऱ्यात तलवारी घेऊन गुंडांचा राडा, एकास अटक
आयुक्त आस्तिकुमार पांडेय यांनी कोविड सेंटर मध्ये जाऊन रुग्णांची भेट घेत त्यांचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर रस्त्यावरून जात असताना विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना त्यांनी चांगलाच दणका दिला. मास्क न वापरल्याने दंड तर लावलाच त्याचबरोबर त्यांच्यावर कोरोना वाढीस कारणीभूत कृती केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले. आयुक्तांनी अवघ्या काही मिनिटात पाच जणांवर कारवाई करत यापुढे महानगरपालिका काय करू शकते, याची प्रचिती दिली.
तर दुसरीकडे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी देखील नागरिकांना शिस्त लावण्यासाठी कडक कारवाईला सुरुवात केली आहे. दुचाकी, रिक्षात नियम मोडणाऱ्या आणि मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर कारवाईला सुरुवात केली आहे. शहरात अनेक ठिकाणी दुचाकीस्वार विनामास्क, डबल-ट्रिपल सीट वाहने चालवताना दिसत आहेत. अशा लोकांची वाहन जप्त करून दंडात्मक कारवाई शहर पोलिसांनी सुरू केली आहे. त्यामुळे आता नागरिकांना जास्तीत जास्त शिस्त लावून, नियमांचे काटेकोरपणे पालन करून कोरोनावर मात करण्यासाठी कठोर पावले प्रशासनातर्फे उचलण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा - तिवरे धरणफुटीला एक वर्ष पूर्ण; मात्र, भेंदवाडीत आजही दिसते ती फक्त स्मशानशांतता