औरंगाबाद - देशभरात विविध ठिकाणी आज विमानांची उड्डाणे सुरू झाल्यानंतर देखील शहरातील विमानसेवा अद्याप सुरू झालेली नाही. यामुळे पर्यटन व्यावसायिकांनी आणि उद्योजकांनी खंत व्यक्त केली आहे. राज्यातील लहान विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र औरंगाबादचे विमानतळ देखील सुरू करण्याची मागणी होत आहे.
औरंगाबाद विमानतळ मराठवाड्यासाठी सर्वात महत्वाचं आहे. मागील काही वर्षांमध्ये विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांनी पाठ फिरवल्याने विमानतळाचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता होती. मात्र, पर्यटन व्यावसायिक आणि उद्योजकांनी प्रयत्न करून काही विमान कंपन्यांना विमानसेवा सुरू करण्याची विनंती केली. त्यावर काही महिन्यांपूर्वी विमानसेवा सुरू झाली; आणि रोज तब्बल 15 उड्डाणे सुरू झाली. यामुळे पर्यटन व्यवसाय आणि उद्योगांना फायदा होण्याची शक्यता निर्माण झाली. मात्र आता कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता विमानसेवा बंद करण्यात आली.
आता तब्बल दोन महिन्यांनी केंद्र सरकारने विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली. मात्र या घोषणेत औरंगाबाद विमानतळाचा उल्लेख नाही. नाशिक-शिर्डी सारख्या छोट्या विमानतळावर परवानगी मिळत असताना औरंगाबादसारख्या मोठ्या विमानतळाला परवानगी का मिळाली नाही, असा संतप्त प्रश्न व्यावसायिकांनी उपस्थित केलाय.
सध्या पर्यटन व्यवसायाला विमानसेवेचा फायदा नसला, तरीही उद्योगांसाठी त्याचा वापर होऊ शकतो. मात्र, नेहमी सारखा शहराला नेतृत्व कमी पडल्याची खंत पर्यटन व्यावसायिक जसवंत सिंग यांनी व्यक्त केली.