औरंगाबाद - कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतलेले प्रमाणपत्र आता नागरिकांना आवश्यक आहे. कुठे नोकारीसाठी तर कुठे प्रवासासाठी हे प्रमाणपत्र गरजेचे झाले आहे. त्यात आता लस न घेताच प्रमाणपत्र दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एक दोन नाही तर तब्बल 16 प्रमाणपत्रे जारी केल्याचे समोर आल्याने पालिकेच्यावतीने पोलिसात धाव घेण्यात आली आहे. वेबसाईट हॅक करून हा प्रकार बाहेरूनच केल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
लसीकरणापेक्षा अधिक आढळल्या नोंदी
शहरात एकूण 56 केंद्रांवर लसीकरण सुरू होते. डीकेएमएम महाविद्यालयाच्या लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी गर्दी होत होती. पहिल्या टप्प्यात 55 टोकन वाटण्यात आले. त्या व्यक्तींची रजिस्टरमध्ये नोंदणी करून नंतर डीकेएमएमच्या कोविन पोर्टलमध्ये त्याची नोंद घेण्यात आली. या सर्वांचे लसीकरण झाल्यावर डाटा तपासताना 71 जणांची नोंद असल्याचे दिसून आले. त्यानुसार ही माहिती डाटा ऑपरेटर शकील खान यांनी तांत्रिक विभाग प्रमुख हेमंत राठोड यांना दिली आणि लसीकरण तातडीने थांबवण्यात आले.
मनपाने पोलिसात दिली तक्रार
या प्रकरणी मनपा आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा आणि डॉ. नीता पाडळकर यांनी तातडीने मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांच्यासोबत चर्चा करून पोलिसात तक्रार देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महापालिकेच्या आरेफ कॉलनी आरोग्य केंद्राच्या प्रमुख डॉ. अंबरीन यांनी प्रमाणपत्र जारी केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार केली आहे. पुढील तपास पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्या मार्गदर्शनात केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा - ठाण्यात फेरीवाल्याचा सहाय्यक आयुक्तावर हल्ला, बोटे छाटली