औरंगाबाद - औरंगाबाद जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. वाढत असलेला संसर्ग पाहता शासकीय कार्यालयात जाताना अँटीजन तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर टाऊनहॉल परिसरातील महापालिका मुख्यालयात बाहेरुन येणाऱ्यांची अँटिजेन कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पालिकेने केली यंत्रणा सज्ज -
महानगर पलिकेसोबत, पोलीस आयुक्तालय, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय याठिकाणी देखील मनपाच्या आरोग्य विभागाद्वारे तपासणी सुरू करण्यात आली आहे. गुरुवारी दिवसभरात सकाळपासून २१ पेक्षा जास्त जणांची अँटिजेन कोरोना चाचणी करण्यात आली. यात कोणीही पॉझिटिव्ह आढळून आलेले नाहीत. मनपा आयुक्त तथा प्रशासकीय आस्तिक कुमार पांडेय यांच्या आदेशानुसार आणि आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेची आरोग्य विभागाची टिम सज्ज अरण्यात आली असून तपासणीत पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास त्यांना उपचारासाठी दाखल करण्यासाठी प्रत्येक कार्यालयाजवळ एक रुग्णवाहिका असणार आहे.
कोरोना रुग्णाची संख्या वाढली -
गेल्या दहा दिवसांपासून शहरात कोरोना रुग्ण संख्या वाढत चालली आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये जवळपास 600 रुग्ण वाढले आहेत. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता पाहता जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलायला सुरुवात केली आहे. रात्रीची संचारबंदी लागू केल्यावर आता शासकीय कार्यालयांमध्ये जाताना अँटीजन तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे.