औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एनसीआर आणि नागरिकत्व संशोधन कायद्यासाठी एबीव्हीपी आणि आंबेडकरी संघटनांचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याचे पहायला मिळाले. या दोन्ही गटांमध्ये किरकोळ हाणामारी झाल्याने विद्यापीठ परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी मध्यस्थी करत वाद मिटवला असून कोणावरही कारवाई करण्यात आलेली नाही. मात्र. विद्यार्थी संघटनांना पोलिसांनी समज दिली असून यापुढे वाद झाल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला.
हेही वाचा... बँकेत तारण ठेवलेले सोने बनावट; जिजामाता बँकेनंतर बुलडाणा अर्बन पतसंस्थेला ८० लाखांचा गंडा
नागरिकत्व संशोधन कायद्याच्या समर्थनार्थ एबीव्हीपीने विद्यापीठात आंदोलन केले. मात्र, एबीव्हीपीच्या आंदोलनाला परवानगी मिळालेली नव्हती. विद्यापीठाला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप करत आंबेडकरी संघटनेच्या आंदोलकांनी विरोध केला. त्यातूनच या दोन्ही संघटनांचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने वाद झाला.
हेही वाचा... CAA Protest Live: देशभर हिंसक आंदोलन; लखनौमध्ये गोळी लागून एकाचा तर मंगळूरमध्ये 2 जणांचा मृत्यू
या घटनेमुळे विद्यापीठात काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी दाखल झाला. त्यानंतर विद्यार्थी संघटनांना समजावून परत पाठवण्यात आले. दरम्यान या काळात तब्बल दीडतास विद्यापीठ परिसरात गोंधळ सुरू होता. एबीव्हीपीला आंदोलनाची परवानगी नव्हती म्हणून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आंबेडकरी संघटनांनी यावेळी केली. आंदोलन करणाऱ्या एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांच्या हातातील झेंडे आंबेडकरी संघटनांच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर फेकत आंदोलन बंद पाडले.
हेही वाचा... अण्णांचे 20 डिसेंबरपासून मौनव्रत; निर्भयाच्या गुन्हेगारांना त्वरित फाशीची केली होती मागणी
आम्ही कोणाच्या विरोधात नाही. तर कायद्याचे स्वागत करत असून विद्यार्थ्यांना हे मान्य असल्याने आम्ही समर्थनासाठी आंदोलन केल्याचे एबीव्हीपीकडून सांगण्यात आले. मात्र एबीव्हीपीला विद्यापीठाने आणि पोलिसांनी परवानगी दिलेली नव्हती. तरी देखील मुद्दाम वाद निर्माण करण्यासाठी हे आंदोलन केले गेले. विद्यापीठाला राजकीय आखाडा केला जातोय, असा आरोप आंबेडकरवादी विद्यार्थी संघटनांनी केला.