औरंगाबाद - काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांच्यासाठी भाजपने सिल्लोड मतदारसंघाची जागा शिवसेनेला दिल्याचे समोर येत आहे. जिल्ह्यातील असलेल्या ९ विधानसभा मतदारसंघांपैकी ५ मतदारसंघ शिवसेना तर ४ मतदारसंघ भाजप लढत होता. मात्र, सत्तार यांच्यासाठी भाजप एक जागा सोडली असून, भाजप नऊपैकी तीन जागांवरच विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित झाले आहे.
सत्तार यांना शिवसेनेने उमेदवारी जाहीर करताच कार्यकर्त्यांनी केला जल्लोष
लोकसभा निवडणुकीमध्ये सिल्लोडचे काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी काँग्रेससोबत बंडखोरी करत पक्षाचा आणि आमदारकीचा देखील राजीनामा दिला होता. त्यानंतर सत्तार भाजपमध्ये येतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र सिल्लोड विधानसभा क्षेत्रातील भाजप कार्यकर्त्यांनी सत्तार यांना पक्ष प्रवेश देण्यास विरोध केला होता. सत्तार यांना जर उमेदवारी दिली तर आपण बंडखोरी करू असा इशारा सिल्लोडच्या भाजप पदाधिकाऱ्यांनी दिला होता. त्यामुळे सत्तार यांनी भाजपऐवजी शिवसेनेत प्रवेश करत स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांना धक्का दिला. यानंतर सिल्लोडची जागा ही कायम भाजप लढवत आला असून ही जागा कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेला देऊ नये, असा आग्रह सिल्लोडच्या स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी केला होता. मात्र 30 सप्टेंबरला अचानक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांना एबी फॉर्म दिल्याचं समोर आले. यामुळे भाजपने सिल्लोडची जागा अब्दुल सत्तार यांच्यासाठी शिवसेनेला दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा... शहादा मतदारसंघातून राजेंद्रकुमार गावित अपक्ष लढण्याच्या तयारीत
2009 पासून सिल्लोड विधानसभा मतदारसंघावर अब्दुल सत्तार यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. तिथल्या बाजार समित्या, पंचायत समिती, नगरपालिका या सर्व अब्दुल सत्तार यांनी आपल्या ताब्यात ठेवण्यास यश मिळवले होते. लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. मात्र उमेदवारी न मिळाल्याने अब्दुल सत्तार यांनी पक्षात बंडखोरी केली, तसेच काँग्रेस विरोधात प्रचार देखील केला होता. याच काळात ते भाजपच्या संपर्कात आले होते. इतकेच नाही तर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सोबत अब्दुल सत्तार हे देखील भाजपवासी होतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र सिल्लोड येथील स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी अब्दुल सत्तार यांच्या पक्ष प्रवेशाला विरोध केला. तसेच सिल्लोड येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन तशी एकमुखी मागणी पक्ष प्रमुखांकडे पदाधिकाऱ्यांनी केली होती.
हेही वाचा... छोट्या पक्षाने केली काँग्रेस राष्ट्रवादीची कोंडी, महाआघाडीच्या घोषणेला विलंब
कुठल्याही परिस्थितीत अब्दुल सत्तार यांना भाजपमध्ये प्रवेश दिला तर सर्व कार्यकर्ते बंडाचे निशाण उघडतील असा देखील भूमिका जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर अचानक मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा सिल्लोडमध्ये आली असता अब्दुल सत्तार हे मुख्यमंत्र्यांसोबत त्यांच्या रथावर स्वार होत, सिल्लोड मधुन निघाले त्यामुळे आता सत्तार यांचा प्रवेश निश्चित होईल अशी शक्यता वर्तवल्याने सिल्लोडच्या भाजप स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये बंडखोरीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर या सर्व विरोधांना चकवा देत, सत्तार यांनी अचानक शिवसेनेत प्रवेश केला आणि भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध मोडून काढला. भाजप सिल्लोड विधानसभा निवडणूक लढवेल अशी शक्यता वर्तवली जात असताना सत्तार यांच्या शिवसेना प्रवेशाने सिल्लोडची भाजपची जागा आता शिवसेनेकडे जाण्याची भीती भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झाली होती. मात्र शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांना एबी फॉर्म दिल्याने आता, सर्व चित्र स्पष्ट झाले.
हेही वाचा... दुसऱ्या यादीतही एकनाथ खडसेंना ठेंगा; पत्ता कापल्याचे निश्चित?