गंगापूर (औरंगाबाद) - पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून मित्राने मित्राचा रुमालाने गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. शिल्लेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वरखेड शिवारात १८ जून रोजी शनिवार सकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गंगापूर तालुक्यातील वरखेड येथे १८ जुन शनिवार रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास वरखेडचे पोलीस पाटील यांनी माहिती दिली की, बाराहाते यांच्या शेतात एक पुरुष जातीचे अनोळखी प्रेत पडलेले आहे. या माहितीवरून शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मंच्छिंद्र सुरवसे हे पोलीस अमंलदारसह तात्काळ घटनास्थळी भेट देवून मृतदेहाची पहाणी केली. अनोळखी व्यक्तीस कोणी तरी अज्ञात कारणावरून अज्ञात व्यक्तीने मारुन टाकले असावे, असा संशय आल्याने लगेच तपासाचे चक्रे फिरवून मृताची तांत्रिक पद्धतीचा वापर करून ओळख पटविली. मृताचे नाव अमन मधुकर निकम (वय 23 वर्षे रा. गंगापूर) असे निष्पन्न झाले.
दोन तासांच्या आत आरोपीस अटक - मृत अवस्थेत असलेल्या अमन निकम यास कोणत्या कारणावरून कोणी मारून टाकले असावे याबाबत तपासाचे चक्र फिरवून तीन पोलीस पथक तयार करून वेगवेगळ्या दिशाने पाठवून तपास करण्यात आला. या गुन्ह्यातील संशयित सागर उर्फ सोनू लक्ष्मण कुऱ्हाडे, वय 25 वर्ष रा. रमाईनगर गंगापूर यास ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्याने खून केल्याची कबुली दिली. अमन निकम याचे पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय मनात बाळगून आरोपी रात्री मित्र दिपक यास कोपरगाव येथे मोटर सायकलवरून सोडण्यास गेला होता. तेथून परत येताना वरखेड शिवारात निर्जनस्थळी नेवून आरोपीने अमनला जाब विचारून त्याची हातरुमालाने गळा अवळून जागेवरच हत्या केली व शेतात मृतदेह टाकून पसार झाला.
या गुन्ह्यातील मृताची ओळख पटवून आरोपीस दोन तासांत मोठ्या शिताफीने पकडून खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक मनीष कलवाणीया, अप्पर पोलीस अधीक्षक, डॉ. पवन बनसोडे, उप विभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी केली. याप्रकरणी शिल्लेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा - Petrol Issue : पेट्रोल पंप चालकांना आता कोटा पद्धत, राज्यात इंधन टंचाईचे संकेत